Uncategorizedविशेष

कवठे येमाई मंदिरातील येमाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिरूर दिनांक (डेली न्यूज पोस्ट टीम -24)नवरात्रीला नवचंडिकेचे नऊ दिवस उपवास करून देवीचे आराधना केली जाते. देवीचा विविध रूपे तीने केलेल्या पराक्रम ,अन्याय अत्याचार करणा-यांचा केलेल्या निप्पात, शक्ती, भक्ती, शौर्य अशी विविध रूपे देवीचे आहेत.

   कवठे येमाई ता. शिरुर येथील येमाई देवी ही अनेक घराण्यांची कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. कवठे गावापासून तीन कि.मी. अंतरावर देवीचे मंदिर आहे. कवठे येमाई या गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्व आहे. लोककलांच्या जागर करीत प्रबोधन आणि मनोरंजन करणा-या लोककलावंताचे हे गाव. कवठे येमाई हे एक जागृत देवस्थान आहे. येथिल मंदिरा संदर्भात माहिती देताना मुख्य विश्वस्त विजयकुमार गोरे पाटील यांनी सांगितले की येथे देवीची दोन मंदिरे आहेत एक नवी येमाई व दुसरी जुनी येमाई . पहिल्या येमाई बाबत देवीचा संदर्भात आख्यायीका सांगितली जाते की श्रीराम दंडकारण्यातून जात असताना सीतेचा विरहाने व्याकूळ झाले असताना आकाशमार्गे शंकर पार्वती चालली होती. पार्वतीचे श्रीरामाकडे लक्ष गेले. शंकराचे ही त्याकडे त्यानी लक्ष वेधले. पार्वतीमातेने सीतामाईचे रूप घेवून श्रीरामाची सत्वपरीक्षा पाहण्याचा निर्णय घेतला. पार्वती सीतामाईचे रूप घेवून तिथे आली. रावणाने आपली धास्ती घेवून सीतामाईला सोडून दिल्याचा बहाना पार्वतीमातेने केला. तेव्हा अंतर्ज्ञानाने श्रीरामाने पार्वतीला ओळखले. आणि शंकराला माझा नमस्कार सांगा असा निरोप धाडला. श्रीरामाने दिलेल्या उत्तराने पार्वती माता अवाक होवून अदृश्य झाली. ज्याठिकाणी पार्वती अदृश्य झाली तिथे एक तांदळा निर्माण झाला. श्रीराम त्या तांदळाची पूजा करून पुढे मार्गस्थ झाले. त्याच ठिकाणी गुरे राखणारी मुले गुरे चरण्यासाठी घेवून आल्यावर नित्यनेमाने देवीचे दर्शन घ्यायचे एक दिवस देवी प्रकट झाली व प्रसन्न होवून म्हणाली की तुला हव ते माग तेव्हा एका गुरख्याने स्वंत;ला शक्ती मागितली तर दुसराने माझ्या घरी चल म्हणून आग्रह धरला. त्यावेळी देवीने अट घातली की मी येते परंतु बरोबर येताना मागे पाहू नको . देवी मागे येत असताना त्याने लक्षात न राहिल्याने मागे पाहिले आणि देवी अदृश्य झाली. ज्या ठिकाणी देवी अदृश्य झाली त्या ठिकाणाला जुनी येमाई म्हणतात.

नव्या येमाई बाबत आख्यायिकसांगितले जाते की एक गुराखी मुलगा रोज आपली गुरे घेवून येताना एका ठिकाणी त्याच्या कळपात रोज एक नवीन गाई येवून मिसळायची . हा प्रकार त्यांने आपल्या आईला सांगितला व म्हणाला की ती गाई मी फुकट सांभाळतो त्याची राखुळी मला कोण देणार. आईने त्या गाईचा शेपटीला धरून गाईचा मालकाकडे जा असे त्याला सुचवले. व त्या मालकाकडून राखुळी घे. तो मुलगा रात्री परतताना त्या गाईची शेपटी धरून मागे निघाला. गाई ओढ्याचा काठी आली आणि पाण्यात घुसली तसा गुराखी ही पाण्यात घुसला तोच आतून निरंजन ताट घेवून देवी गाईला ओवाळायला आली. त्या मुलाने देवीला राखुळी मागितली ,देवीने त्याला मोहरा बांधून दिल्या. त्या मोहरांचा जागेवर पेटते कोळसेच दिले असे त्या गुराख्याला वाटले . त्याने ते सोडून पहिले ते तर पेटलेले कोळसेच निघाले. त्याने ते खाली टाकून देताच त्याच्या गारा झाल्या. त्या ठिकाणाला गारमाळ म्हणतात.नाराज झालेला गुराखी घरी आला आणि सर्व प्रकार आईला सांगितला. आईने घोंगडी झटकली तर त्यात एक मोहर निघाली .आईला सर्व प्रकार लक्षात आला व तिने देवीची प्रार्थना केली. देवीने प्रसन्न होवून माझे मंदिर बांध म्हणून सांगितले.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिराची उभारणी धारचा पवार संस्थानिकांनी केली. त्यावेळी कवठे गावचे संस्थानिक श्रीमंत आनंदराव उदाजी पवार होते. पवारांनीच या मंदिराचे व्यवस्थापन व पूजा अर्चेची जबाबदारी गोरे कुटुंबीयाकडे सोपविली ती आजतगायत कायम आहे. अशी माहिती मंदिराचे विश्वस्त गोरे यांनी दिली .

गावाचा उत्तरेस तीन कि. मी अंतरावर घोडनदी आहे. गावाचा दक्षिणेस तीन कि.मी. अंतरावर येमाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. देवालया भोवती मोठ्या तटबंदीचा वाडा आहे . त्यास पूर्वेकडून व उत्तरेकडून दोन प्रवेशद्वारे आहेत. मोठे नगारे असून तीन मोठ्या घंटा मंदिराच्या समोरच आहेत. तीन दीपमाळ्या मंदिराचा आवारात आहेत. मंदिराबाहेर मोठा दगडी ओट्या असून त्यावर दोन दगडी हत्तीचा मूर्ती आहेत. मागे महादेवाचे १५ फुट खोल असे मंदिर आहे. पिंपळाचे मोठे वृक्ष आणि त्याला बांधलेले पार आहेत. येणा-या भाविकांसाठी विश्रांतीगृह बांधण्यात आली आहेत. सभामंडप ही बांधण्यात आला आहे. येमाई देवीची नित्यपूजा अर्चा आरती गुरव(शिंदे) व भगत (ढोरके) परिवार करतात.मंदिराचा व्यवस्था गोरे पाटील परिवार पहातात. येमाई देवी मंदिराचा जीर्णोद्धारचे काम भाविक व ग्रामस्थांचा सहकार्याने सुरू आहे. नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो त्यात. सप्तशती पाठ वाचन, ओलंडा, महाआरती, जागरण गोंधळ, देवीची गाणी, महाआरती भजने, कथ्थक नृत्ये, भजने, अभंग , भावगीते असे विविध कार्यक्रम होत असतात. विजयादशमीला सीमोल्लंघनासाठी पालखी निघते. जुन्या येमाई मंदिराकडे जाते. पुणे , नगर मुंबई, ठाणे, यापरिसरातील अनेक परिवारांची कवठे येमाई कुलदैवता असून कुलाचार विधी करण्यासाठी राज्य व परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. देवस्थानला क वर्ग दर्जा मिळाला असून चैत्र शुद्ध पौर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून मंदिर जीर्णोद्धारचे काम सुरू असल्याचे विजयकुमार रामचंद्र गोरे पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button