महाराष्ट्र

शिरूर तालुक्यात २२३ शिक्षक पदे रिक्त; शासनाला निवेदन, आंदोलनाचा इशारा

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेत तब्बल २२३ शिक्षक पदे रिक्त असल्याचा दावा करत ही पदे तातडीने भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा व्हिसलब्लोअर निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्री, ग्रामविकासमंत्री, मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास मंत्रालयासमोर शांततापूर्ण सामाजिक आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाळुंज यांनी निवेदनात म्हटले आहे की, शिरूर तालुक्यात उपशिक्षकांची १२८, पदवीधर शिक्षकांची ८३ आणि मुख्याध्यापकांची १२ अशी एकूण २२३ पदे रिक्त आहेत. तालुक्यात ३५२ शाळा कार्यरत असून २०२५ मध्ये दोन शाळा बंद झाल्याचे समजते. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असून ही बाब भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या प्रश्नाबाबत जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संजय नाईकडे तसेच जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याशी दूरध्वनी आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. सामाजिक प्रश्नांबाबत प्रशासनाकडून संवादाचा अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

निवेदनात रिक्त शिक्षक पदे तातडीने भरणे, ग्रामीण शाळांसाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करणे, भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करणे, शिक्षक भरती व रिक्त पदांची अद्ययावत माहिती सार्वजनिक करणे आणि सरकारी शिक्षण व्यवस्थेवरील पालकांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने मंत्रालय, मुंबई येथे शांततापूर्ण सामाजिक आंदोलन छेडण्याचा इशाराही वाळुंज यांनी निवेदनातून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button