शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: भगवे झेंडे, भगव्या पताका आणि चिमुकल्या मावळ्यांचा दिमाखदार जल्लोष… ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजराने परिसर दणाणून गेला आणि क्षणभर जणू शिवसृष्टीच अवतरली! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर छाप पाडली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली.शालेय समितीचे अध्यक्ष शिरीष बरमेचा, शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ सदस्य शि्रीष गादिया, माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी, मुख्याध्यापक गुरुदत्त पाचर्णे, रंगकर्मी दीपक घारू, मुख्याध्यापिका अश्विनी घारू आणि प्रशासकीय अधिकारी संजय देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
रायरेश्वरची शपथ साकारली
विद्यार्थ्यांनी रायरेश्वर मंदिरात घेतलेल्या स्वराज्य शपथेचा प्रसंग रंगमंचावर साकारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘राजे आलं’, ‘मल्हारी मल्हारी’ या गीतांवर सादर केलेल्या नृत्याविष्काराने वातावरण भारावून गेले. अनुष्का जठार हिने अफजलखान भेटीवरील दमदार पोवाडा सादर करताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे केले. ‘आम्ही डोंगरावर राहणारे’ या गीतानेही देशभक्तीचा स्वर गुंजला.
पालक व विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज यांच्या जीवनातील दहा प्रेरणादायी प्रसंग सादर करत मातृसंस्कारांची गाथा उलगडली.
‘शिवजयंती म्हणजे मूल्यांचा उत्सव’
देविका साळवे हिने आपल्या भाषणातून शिवरायांच्या कार्याचा वेध घेतला. “शेतकऱ्यांना मदत करणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि स्त्रियांचा सन्मान राखणे—हीच खरी शिवजयंती,” असे ती ठामपणे म्हणाली. तिच्या शब्दांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
संपूर्ण कार्यक्रम भर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष दुमदुमत राहिला. अध्यक्षीय भाषणात शिरीष बरमेचा यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक व स्वागत प्राचार्या अश्विनी घारू यांनी केले. यावेळी आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक अयांश दुर्गेश परदेशी व निकिता दुर्गेश परदेशी.
द्वितीय क्रमांक – अथर्वा राजू परदेशी व पूजा राजू परदेशी
तृतीय क्रमांक विहान प्रमोद महामुनकर व अपर्णा प्रमोद महामुनकर यांचा क्रमांक आला. परीक्षण माजी मुख्याध्यापक व्हि.डि.कुलकर्णी व प्रा. सतीश धुमाळ यांनी केले.
शिरूरमध्ये साजरी झालेली ही शिवजयंती केवळ उत्सव नव्हती; ती होती स्वराज्याच्या मूल्यांची, संस्कारांची आणि अभिमानाची.