राष्ट्रीय

आगामी शिरूर लोकसभा निवडणूक लढवणारच : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

oplus_131074

शिरूर:{ डेली न्यूज पोस्ट टीम 24,}आगामी शिरूर लोकसभा निवडणूक आपण निश्चितपणे लढणार असून, मागील काही वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघात ६०० कोटी रुपयांहून अधिक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्या तुलनेत सलग दोन टर्म खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी किती विकासकामे केली यांचा जनतेला हिशोब द्यावा असे आव्हान म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले.

शिरूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आढळराव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चाकण, आळंदी, जुन्नर, राजगुरूनगर, शिरूर आणि मंचर येथील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून मार्गी लावण्यात आली. विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले असून, भविष्यातही विकासाची ही गती कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे–शिरूर रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे, तसेच नाशिक फाटा–राजगुरूनगर महामार्गाच्या कामाची कार्यादेश (वर्क ऑर्डर) लवकरात लवकर निघावी, अशी मागणी त्यांनी केली. चाकण–कुरळी–भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या मार्गाचे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे–नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर खेड या परिसरातून व्हावा यासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. “लोकसभा निवडणुकीत विमानतळ, चाकण वाहतूक कोंडी यांसारख्या मुद्द्यांवर मते मागितली; मात्र निवडून आल्यानंतर हे विषय बाजूलाच पडले. इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाचे पुढे काय झाले,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“निवडणुकीच्या काळात भावनिक प्रचार करायचे , संसदेतील भाषणे सोशल मीडियावर प्रसारित करायची, एवढ्यावर जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. भाषण करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे होणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी टीकाही आढळराव यांनी केली.

आगामी लोकसभा निवडणूक आपण लढणार असल्याचा पुनरुच्चार करत, मतदारसंघातील गावागावांत आपला सातत्याने संपर्क असून नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराची हद्दवाढ ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. हद्दवाढ झाल्यास विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे, नगरसेविका पूजा पोटावळे, नगरसेवक सागर नरवडे, उमेश शेळके, संतोष थेऊरकर, दिनेश मांडगे, निलेश पवार तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात, सुरेश गाडेकर, तुषार जांभळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button