Uncategorized

समस्यांकडे संधी म्हणून पाहा; उद्योजक बना : प्रा. हेमंत भागवत

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींचा विचार न करता स्वयंरोजगार आणि उद्योजकतेकडे गांभीर्याने पाहावे. आपल्या आजूबाजूच्या समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधल्यास व्यवसायाबरोबरच रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन प्रा. हेमंत भागवत यांनी केले.

जीवन विकास मंदिर माध्यमिक विभागात ‘बाल उद्यमी यात्रा’अंतर्गत वित्तीय जागृती आणि आर्थिक साक्षरता या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक व्यवहाराचे ज्ञान, बचत, आर्थिक नियोजन, कौशल्यविकास तसेच उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक होते. विश्वस्त दत्तात्रय शिंदे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिलीप शिंदे आणि माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गंगाधर तोडमल यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना भागवत यांनी, उद्योजकता म्हणजे केवळ मोठा व्यवसाय उभारणे नव्हे, तर समाजातील समस्या ओळखून त्यावर प्रभावी उपाय शोधत मूल्यनिर्मितीची संधी निर्माण करणे होय, असे स्पष्ट केले. व्यवसायासाठी भांडवलाबरोबरच कौशल्य, तांत्रिक ज्ञान, मनुष्यबळ, बाजारपेठेचा अभ्यास, ग्राहकांच्या गरजा आणि योग्य नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘नोकरीची संधी मिळाली नाही तर मी काय करू शकतो?’ हा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करून बदलत्या काळानुसार स्वतःला सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अपयशाला न घाबरता त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करणे हीच यशाची प्रक्रिया असल्याचेही त्यांनी नमूद केले.

इयत्ता आठवी व दहावीतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत व्यवसाय, रोजगार, भांडवल, कौशल्यविकास आणि आर्थिक नियोजनाबाबत प्रश्न विचारले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले. ललिता सहाने यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राजेंद्र मोरे, सुभाष बनकर आणि सोमनाथ कोतवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. ललिता सहाने यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button