Uncategorized

गणेशोत्सवा दरम्यान ध्वनी मर्यादा पाळण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचे आवाहन

oplus_131074

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}गणेशोत्सव आनंद आणि उत्साहात साजरा करताना महिला व मुलांची सुरक्षितता, सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून विशेष पत्रक तयार करण्यात आले आहे. ही पत्रके गणेश मंडळांना देऊन उत्सवादरम्यान व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली.
सार्वजनिक गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहात गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समिती व महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक गिल प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
गिल म्हणाले, “सण-उत्सव साजरा करण्यामागे काहीतरी उद्देश असतो. सण उत्सव साजरा करताना आनंद आणि उत्साह कायम ठेवत सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठीही सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे.” मुलांच्या हक्कांविषयी आणि संरक्षणाबाबत प्रत्येकाने संवेदनशील राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शाळांमध्ये ‘गुड टच-बॅड टच’बाबत पोलिसांकडून मार्गदर्शन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे सांगत गिल यांनी उत्सव साजरा करताना कायदा आणि विज्ञानाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा पाळण्याचे आवाहन केले. शिरूरमध्ये सामाजिक सलोखा आणि एकात्मतेची परंपरा असून ती कायम राखण्याचे आवाहनही त्यांनी केले. अमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू असून तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे, असेही त्यांनी सांगितले.
गणेश विसर्जनासाठी आवश्यक सुविधा देणार
नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांनी गणेश मंडळांच्या सूचनांचा विचार करून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे सांगितले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिलांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार असून गणेश मंडळांनी वृक्षारोपणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले. विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी प्रा. चंद्रकांत धापटे यांनी बोरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी गणेशोत्सवात स्वयंसेवक म्हणून काम करतील, असे सांगितले. प्रितेश फुलडाळे यांनी विसर्जन मार्गावरील स्वच्छता, खड्डे बुजविणे आणि विसर्जन घाटावर फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
नगरसेवक उमेश शेळके यांनी ध्वनिक्षेपक व डीजेवरील नियम सर्व सण-समारंभांना समान असावेत, तसेच मूर्तीदानाची सक्ती करू नये, अशी भूमिका मांडली. सावळाराम आवारी यांनी विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याची सूचना केली. योगेश पवार यांनी कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
महिबूब सय्यद यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. मुकुंद ढोबळे यांनी विसर्जन घाटावर होडीत बसणाऱ्या व्यक्तींसाठी सुरक्षा जॅकेट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सभापती सुनील जाधव यांनी विसर्जन घाटावर मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्याची सूचना केली. उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जाईल, असे सांगितले.
प्रा. सतीश धुमाळ यांनी गणेशोत्सव व विसर्जन काळात विविध शासकीय विभागांमध्ये प्रभावी समन्वय राहील, असे नियोजन करण्याची सूचना केली. यावेळी पंचायत समिती सभापती स्वाती घावटे, सभापती स्वाती साठे, एजाज बागवान, सुनिल जाधव,सरपंच शिल्पा गायकवाड,प्रा. चंद्रकांत धापटे, डॉ. वैशाली साखरे, वैशाली गायकवाड, सविता बोरुडे, शंकरकाका परदेशी, बापू सानप, शशिकला काळे, रेश्मा शेख, रमणलाल भंडारी, प्रमोद सांगवेकर, बाबुराव पाचंगे यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती व महिला दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button