राष्ट्रीय

चौथ्या श्रावणी सोमवारी रामलिंग, देव्हडेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम – 24}: चौथ्या व शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त शिरूर शहरालगत असलेल्या श्री रामलिंग महाराज मंदिर तसेच देव्हडेश्वर महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. ‘हर हर महादेव’, ‘रामलिंग महाराज की जय’, ‘देव्हडेश्वर महाराज की जय’ आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.

श्री रामलिंग महाराज मंदिरातील शिवपिंडीबाबत पौराणिक आख्यायिका प्रचलित असून, प्रभू श्रीराम वनवासात असताना या परिसरात आले होते आणि त्यांनी स्वतः या शिवपिंडीची स्थापना केली, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात दररोज शिरूर शहरातून अनेक भाविक पहाटे पायी वारी करत रामलिंग मंदिरात दर्शनासाठी जातात. शेवटच्या श्रावणी सोमवारी या पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.

दरम्यान, श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शिरूर शहरातील भाविकांनी एकत्र येऊन घोडनदी पात्रातील पाणी कावड यात्रेद्वारे रामलिंग मंदिरात नेण्याची परंपरा सुरू केली आहे. चौथ्या श्रावणी सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास कावड यात्रा रामलिंग मंदिराकडे रवाना झाली. पहाटे अडीचच्या सुमारास कावड यात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर शिवपिंडीवर जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती पार पडली.

या कावड यात्रेत संतोष गवळी, सदानंद लांडे, चंद्रकांत घावटे, अशोक भोसले, पठारे मामा, लक्ष्मण धोत्रे, श्याम कोळपकर, राजेंद्र जाधव, गोपीनाथ पठारे, श्याम चिखलीकर, सतीश धुमाळ यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले होते.

श्रावणी सोमवारनिमित्त रामलिंग मंदिराच्या प्रवेशद्वारासह गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे मंदिर परिसराचे रूप अधिकच खुलून दिसत होते. अशी माहिती रामलिंग देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पोपटराव दसगुडे यांनी दिली.

८०० किलो खिचडीचा महाप्रसाद

श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात तब्बल ८०० किलो खिचडीचा महाप्रसाद ठेवण्यात आला होता. दिवसभर मंदिरात येणाऱ्या भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाचे आयोजन रत्नाकर श्रीरंगराव कोळपकर, महेश रमाकांत रासने, अजित मनोहर डोंगरे आणि चेतन दिनेश रासने यांनी केले होते.

दिवसभर रामलिंग व देव्हडेश्वर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी राहिली. भक्तांनी श्रद्धेने दर्शन घेत जलाभिषेक, पूजा व आरतीमध्ये सहभाग घेतला. विविध धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button