शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: अल्पवयीन मुलीला वडापाव व पैशांचे आमिष दाखवून तसेच धमकी देत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरंग ठकाजी अनोसे (रा. अनोसेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत अनोसेवाडी-कळवंतवाडी परिसरात ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आरोपीला पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याने तिला आमिष दाखवून व धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान ती सात ते आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६४, १२७(२), ३५१(२), ३५१(३), पॉक्सो कायद्यातील कलम ६, ८, १२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले करीत आहेत.