उद्योग, समाजकारण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे , असे शिरूरचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रकाशजी रसिकलाल धारीवाल यांच्या ७ मार्च रोजी वाढदिवस. कष्ट, दूरदृष्टी आणि माणुसकीच्या बळावर त्यांनी उभारलेली वाटचाल आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.साधेपणा, नम्रता आणि सर्वांशी आपुलकीने संवाद साधण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.
उद्योगविश्वात उत्तुंग यश संपादन करत असतानाच समाजकारण, अध्यात्म आणि सार्वजनिक जीवनातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच शिरूरकरांसह सर्वसामान्यांच्या ते “आधारवड” म्हणून ओळखले जातात.व सर्वसामान्यांसह सर्वांचे ते भाऊ आहेत. 
संस्कारातून घडलेले व्यक्तिमत्त्व प्रकाशजी धारीवाल यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण वडील स्व. रसिकलालजी धारीवाल, मातोश्री कमलबाई धारीवाल आणि आजी मदनबाई माणिकचंद धारीवाल यांच्या संस्कारातून झाली. बालपणापासूनच उद्योग-व्यवसायाची आवड, कष्टाची तयारी आणि मित्रपरिवारात रमणारा त्याच्या स्वभाव आहे.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी उद्योगक्षेत्रात पदार्पण केले. प्रामाणिकपणा, सचोटी आणि गुणवत्तेवर असलेला विश्वास यांच्या जोरावर त्यांनी उद्योगविश्वात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. अडचणी आणि संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याची जिद्द त्यांनी कधीही सोडली नाही. त्यामुळेच आज त्यांचे नाव उद्योगविश्वात आदराने घेतले जाते.
गुणवत्तेचा स्वतंत्र ब्रँड
“जे करायचे ते उत्कृष्ट आणि दर्जेदार” हा त्यांचा व्यवसायाचा मंत्र आहे. याच तत्वावर त्यांनी उद्योगविश्वात गुणवत्तेचा स्वतंत्र ब्रँड निर्माण केला आहे.
अलीकडेच त्यांनी “इंडिफेस्ट” या नावाने फूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आहे. उपमा, पोहे, इडली-डोसा, गुलाबजाम, ढोकळा अशा विविध इंस्टंट खाद्यपदार्थांच्या माध्यमातून ग्राहकांना सोयीस्कर आणि दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
समाजकारणाची जाणीव
उद्योगात यश मिळवताना समाजाप्रती असलेली बांधिलकी त्यांनी कधीही विसरली नाही.गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा छावण्या, विविध भागात पिण्याच्या पाण्याचे टँकरद्वारे वितरण, कोरोना काळात घरपोच अन्नसेवा तसेच विविध सामाजिक संस्थांना दिलेली मदत अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा ठसा उमटवला आहे.त्यांच्या या कार्यातून उद्योगपती म्हणजे केवळ व्यवसाय करणारा नव्हे तर समाजाशी नाळ जोडलेला व्यक्ती असतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
देशभरात धरिवाल परिवार त्याच्या उद्योजकते बरोबरच दानशूरते साठी ओळखला जातो. स्वर्गीय रसिकलाल धारिवाल यांनी देशभरातील विविध धार्मियाची मंदिरे, धर्मशाळा व इमारती त्याच बरोबर दवाखाने,शैक्षणिक संस्था साठी सढळ हाताने देणग्या दिल्या. तोच दानशूरतेचा यथार्थ व समर्थ वारसा प्रकाशजी धारिवाल व सुपुत्र आदित्य धारिवाल समर्थपणे चालवीत आहे.
परंपरेचा वारसा आणि अध्यात्माशी नाळ
स्व. रसिकलालजी धारीवाल यांनी सुरू केलेल्या रामलिंग महाराज पालखी सोहळ्याला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. वडिलांच्या निधनानंतर मंदिर व यात्रेची जबाबदारी प्रकाशजी धारीवाल यांनी समर्थपणे सांभाळली आहे.पालखी सोहळ्याच्या दिवशी ते स्वतः पायी पालखी सोबत रामलिंग मंदिरापर्यंत जातात आणि भक्तांसह दर्शन घेतात. प्रभू रामलिंग महाराजांवरील त्यांची निस्सीम श्रद्धा सर्वश्रुत आहे.
सार्वजनिक जीवनातील योगदान
शिरूर नगरपरिषदेचे नेतृत्व करत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सभागृहनेता अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
त्यांच्या कार्यकाळात अत्याधुनिक सुविधा असलेली नवीन नगरपरिषद इमारत, चिंचणी धरणातून पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना आणि विविध रस्ते विकास अशी अनेक महत्त्वाची कामे मार्गी लागली. शिरूर शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालीत पत्नी दीनाभाभी धारीवाल आणि सुपुत्र आदित्य धारीवाल यांची साथ सावली प्रमाणे त्यांना लाभली आहे. कन्या साक्षी यांच्या विवाह सोहळ्यात त्यांनी शिरूरकरांप्रती असलेले प्रेम पुन्हा अधोरेखित केले. समाजातील सर्व घटकांना प्रेमाने निमंत्रित करून आयोजित केलेला तो भव्य सोहळा अनेकांच्या स्मरणात आजही ताजा आहे.
शिवमहापुराण कथेचा भव्य सोहळा
अलीकडेच प्रकाशजी धारीवाल यांच्या मुख्य संयोजनातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन रामलिंग रोड शिरूर येथे करण्यात आले.
या धार्मिक सोहळ्यास लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. श्रद्धा, विश्वास आणि सदाचाराचा संदेश देणारा हा कार्यक्रम शिरूर शहरासाठी ऐतिहासिक ठरला.
भाविकांच्या सेवेसाठी स्वतः प्रकाशजी धारीवाल, त्यांचे सुपुत्र आदित्य धारीवाल, दीनाभाभी धारीवाल आणि कुटुंबीय उपस्थित राहून आदरातिथ्य करत होते. जागतिक स्तरावरील उद्योगपती असतानाही ते भाविकांमध्ये सर्वसामान्यांसारखे मिसळून जात असल्याचे दृश्य अनेकांना भावून गेले.
बदलत्या शिरूरचा विश्वास
रांजणगाव, सुपा आणि कर्डे एमआयडीसी, प्रस्तावित रेल्वेमार्ग आणि महामार्गांचे जाळे यामुळे शिरूर शहर झपाट्याने विकसित होत आहे. या बदलत्या शिरूरच्या प्रगतीत प्रकाशजी धारीवाल यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शिरूरकरांना आहे. रामलिंग देवस्थान ट्रस्ट शिरूर, शिवसेना मंदिर ट्रस्ट शिरूर, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय नियामक मंडळ येथे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 
प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
साधेपणा, नम्रता, कष्ट आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे उद्योगविश्वात आणि समाजात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे प्रकाशजी रसिकलाल धारीवाल.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
त्यांचे आयुष्य निरोगी, यशस्वी आणि समाजसेवेने उजळत राहो, हीच प्रार्थना. 🌹शब्दांकन – प्रा. सतीश धुमाळ









