रसिक विचार मंचच्या वतीने शिवमहा पुराण कथेचे आयोजन केल्याबद्दल रसिक विचार मंचच्या वतीने उद्योगपती प्रकाशलालजी रसिकलालजी धारिवाल व आदित्य प्रकाशलालजी धारिवाल यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून आयोजित करण्यात आलेल्या श्री शिव महापुराण कथेच्या भव्य अध्यात्मिक सोहळ्यामुळे शिरूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रसिक विचार मंच यांच्या वतीने उद्योगपती प्रकाश धारिवाल व आदित्य धारिवाल यांना मानपत्र, शाल व वृक्षरोप देऊन सन्मानित करण्यात आले.
रामलिंग रोडवरील कथामंडपात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यास शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. रसिक विचार मंचचे सदस्य मध्यकांत पानसरे, प्रा. सतीश धुमाळ,बांधकाम व्यवसायिक संदीप बिहाणी,नगरसेवक सागर नरवडे,प्रा. चंद्रकांत धापटे, माजी सभापती प्रदीप बारवकर, आशिष नहार, हॉटेल व्यवसायिक चंद्रकांत चोपडा, डॉ. रविन बोरा, प्राचार्य डॉ. समीर ओंकार, विनोद बोथरा, माजी नगरपालिका अधिकारी चंद्रकांत करळे, कामिनी बाफना, सुनीता बिहाणी, विकास सुराणा, संघपती भरत चोरडिया, माजी सभापती सचिन धाडीवाल, मोहित साखला, राजेश शिंगवी, देवल शहा आदी उपस्थित होते.
धारिवाल परिवार सातत्याने धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असून, शिरूरमध्ये प्रथमच एवढ्या भव्य स्वरूपात शिवमहापुराण कथेचा सोहळा पार पडल्याने हजारो भाविकांना कथा श्रवणाचा लाभ मिळाला. या सोहळ्यामुळे शहरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.
रसिक विचार मंचच्या वतीने सांगण्यात आले की, स्वर्गीय उद्योगपती रसिकलालजी धारिवाल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. यंदा शिवमहापुराण कथेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उद्योगपती प्रकाश धारिवाल यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
सन्मान स्वीकारताना प्रकाश धारिवाल यांनी कृतज्ञता व्यक्त करत, “हा सोहळा सर्व शिरूरकरांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाला. वडील रसिकलालजी धारिवाल हे रामलिंगाचे परम भक्त होते. त्यांच्या आशीर्वादानेच हा अध्यात्मिक सोहळा साकार झाला,” असे नमूद केले.
मानपत्राचे शब्दांकन प्रा. सतीश धुमाळ यांनी केले, तर त्याचे वाचन प्रदीप बारवकर यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत संदीप बिहाणी यांनी केले आणि आभार प्रदर्शन मध्यकांत पानसरे यांनी मानले.
भव्य नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि भक्तिमय वातावरणामुळे हा सोहळा शिरूरच्या सांस्कृतिक इतिहासात नोंदवला जाईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.