विशेष

थकीत करांवर शिरूर नगरपरिषदेची धडक कारवाई; दोन मालमत्तांना सील

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगर परिषद ने थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी धडक मोहीम राबवत दोन मालमत्तांवर सील ठोकण्याची कारवाई केली. आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

नगरपरिषदेचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर दरवर्षी १ एप्रिल रोजी देय होतो. पहिल्या सहा महिन्यांच्या आत कर भरणे अनिवार्य असून, अन्यथा महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १५० अ (१) नुसार थकीत रकमेवर दरमहा २ टक्के दंड आकारला जातो.

नगरपरिषदेकडून सर्व मिळकतधारकांना आतापर्यंत भ्रमणध्वनीवरून चार वेळा कर भरण्याबाबत संदेश पाठविण्यात आले आहेत. सप्टेंबर २०२५ पासून कर न भरल्यास २ टक्के दंड आकारला जाईल, याची घंटागाडीच्या माध्यमातून शहरात दवंडी देऊनही माहिती देण्यात आली होती. तसेच ऑगस्ट २०२६ पासून तीन वेळा विशेष वसुली अभियान राबविण्यात आले आहे.

घोडनदी येथील करसंकलन विभागाने मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत मंगळवारी (दि. ४ मार्च २०२६) सी. टी. बोरा कॉलेज रोडवरील श्रीराम मार्केट सिटी येथील दोन थकीत मालमत्तांना सील करण्यात आले.

मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी स्पष्ट केले की, थकीत कर न भरल्यास जप्ती व अटकावणीची कारवाई पुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे मिळकतधारकांनी त्वरित थकीत रक्कम भरून अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नगरपरिषदेच्या या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, येत्या काही दिवसांत आणखी मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button