Uncategorized

शिरूर नगर परिषदचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर

विकासकामांना प्राधान्य; करभारात वाढ नाही

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}सर्वसामान्य नागरिकांवर कराचा अतिरिक्त भार न टाकता विकासाला गती देण्याचा निर्धार करत शिरूर नगर परिषदने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अर्थसंकल्प विशेष सभेत सादर केला. वित्तीय शिस्त, मर्यादित उत्पन्न-खर्चाचा समतोल आणि सर्वांगीण शाश्वत विकास यांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची कर वाढ करण्यात आलेली नसून, बांधकाम विकास शुल्क आणि विविध योजनांमधील निधी उभारणीवर भर देण्यात आला आहे. महिला व बालकल्याण, दुर्बल घटक आणि दिव्यांग नागरिकांसाठी शासननिर्णयानुसार ५ टक्के तरतूद करण्यात आली आहे.

नगरपरिषदेने सुमारे १८ लाख रुपयांच्या शिल्लकीसह संतुलित अर्थसंकल्प सादर केला आहे. मर्यादित उत्पन्नाच्या चौकटीत राहून आवश्यक खर्च साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, नवीन आर्थिक वर्षात कर वसुलीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पाणीपुरवठा योजना, शहर सुशोभीकरण, विविध भागांतील रस्ते मजबुतीकरण, जलनिस्सारण सुधारणा, स्वच्छता उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांना विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच शिक्षण, आरोग्य व सामाजिक सुविधा बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी नियोजित निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी सर्व घटकांच्या सहभागातून नियोजनबद्ध कार्यवाही केली जाईल. नागरिकांकडून कररूपाने मिळणारा निधी पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने वापरण्यात येईल.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी नमूद केले की, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा दस्तऐवज नसून शहराच्या विकासाचा रोडमॅप आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून ठरविलेल्या उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करावी, असे निर्देश विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button