क्राईम
खून प्रकरणातील आरोपीला अवघ्या १२ तासांत अटक
शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) –
दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मित्राचा खून करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांनी केवळ १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत .
शनिवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास वडगाव रासाई गाव हद्दीत सृष्टी हॉटेलजवळील अंबिका पानटपरीसमोर ही घटना घडली. मृताचे नाव अविनाश उर्फ विशाल जयवंत जावीर (वय ३०, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे असून आरोपीचे नाव राहुल दत्ता गव्हांडे (वय २३, सध्या रा. वडगाव रासाई, मूळ रा. धनज, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आहे.
दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादात आरोपीने संतापाच्या भरात अविनाश जावीर याला मारहाण करून डोक्यावर दगड आपटला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५९७/२०२५, कलम १०३ भा.न्या.सं. प्रमाणे खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हणमंत नकाते करत आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके तयार करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हणमंत नकाते, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने, तसेच हवालदार, अंमलदारांसह जवळपास वीस जणांचे पथक आरोपीच्या शोधात निघाले.
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तपासणी व स्थानिक पोलिस मित्र सागर उर्फ सोनु कोळपे यांच्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी पाटील माळ, वडगाव रासाई येथे असल्याचे समजले. पोलिसांनी शिताफीने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
