क्राईम

९० वर्षीय महिलेच्या गळ्यातील ६ तोळे दागिने हिसकावणारा २४ तासांत जेरबंद शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ४.८० लाखांचा ऐवज हस्तगत

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शरदवाडी (जांबुत), ता. शिरूर येथे ९० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सहा तोळे सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून नेणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक १५१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता ही घटना घडली. फिर्यादी मच्छिंद्र सखाराम सरोदे (रा. शरदवाडी, जांबुत) हे घराबाहेर गेले असताना त्यांच्या आई लहानुबाई सखाराम सरोदे (वय ९०) या घरासमोर बसलेल्या होत्या. त्यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील अंदाजे सहा तोळे (सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किंमतीचे) सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून पळ काढला.

घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी तत्काळ तपास पथकाला सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण आणि खबर्‍यांकडून माहिती संकलित करून पोलिसांनी संशयित आकाश किसन मेरगळ (वय २०, रा. पंचतळे जांबुत, ता. शिरूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले सहा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक करांडे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने केली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button