शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर नगरपालिका निवडणुकीकरिता जनता दल धर्मनिरपेक्ष सह अन्य पक्ष तिस-या आघाडीसह निवडणुक मैदानात शिरूर परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून उतरून निवडणुक लढविणार आहे.
यासंदर्भातील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष फिरोज सय्यद भारतीय बहुजन पालक संघ महाराष्ट्र राज्य संयोजक व शिरूर परिवर्तन पॅनलचे समन्वयक नाथाभाऊ पाचर्णे, जनता दलचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल माळवदकर, आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष अनिल डांगे,सेवानिवृत्त अधिकारी वसंत बेंद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नाथाभाऊ पाचर्णे म्हणाले की सर्वसामान्य लोकांना निवडणुक लढवून निवडून जाता यावे याकरिता शहरातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन शिरूर परिवर्तन आघाडी स्थापन करून शिरूर नगरपरिष निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला असून नगरसेवकपदासह नगरध्यक्षपदाची निवडणूक आघाडीचे उमेदवार लढविणार आहेत.
सर्वसामान्य व प्रामाणिक उमेदवार निवडणुकीत रिंगणात उतरवले जाणार असून शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, शिक्षण सुविधा, घनकचरा निर्मूलन व हद्दवाढ व शिरूर शहराचा सर्वांगीण विकास या मुद्दावर निवडणुक लढवणार असल्याचे पाचर्णे म्हणाले.
जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर म्हणाले की सर्वसामान्यांच्या प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते व राजकीय पक्ष शिरूर परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आले असून यंदाचा निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी आघाडीचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील असेही बारवकर यांनी सांगितले.
प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल माळ वदकर म्हणाले की जनता दल धर्मनिरपेक्ष , प्रहार जनशक्ती पक्ष, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पक्ष, या सर्व पक्षाची तिसरी आघाडी शिरूर नगरपरिषदेची निवडणुक एकत्रित लढविणार आहे.
शिरूर नगर परिषदेची निवडणूक लढवणे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून या दोन्ही पक्षांचा एकत्रित पॅनल निवडणुकीला असणार की दोन्ही पक्षाचे स्वतंत्र पॅनल असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस {शरदचंद्र पवार} काँग्रेस आय व शिवसेना {ठाकरे }यांनीही एकत्र शिरूर नगरपरिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.सहाजिकच शिरूर नगर परिषदेच्या निवडणुका तिरंगी होणार की चौरंगी हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल