राष्ट्रीयविशेष

जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेला प्राण गमवावे लागले 

शिरूर{, डेली न्यूज पोस्ट टीम -24}
शिरूर तालुक्यातील जांबूत (ता. शिरूर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ऐन दिवाळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७२, रा. जांबूत, ता. शिरूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पहाटे सहाच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालून उसाच्या शेतात ओढत नेले. काही वेळाने त्यांचा मृतदेह घरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर सापडला. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे.
तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जांबूत येथे १२ आणि टाकळी हाजी येथे २ असे एकूण १४ पिंजरे लावण्यात आले आहेत. मागील आठ दिवसांत पिंपरखेड परिसरातून तीन आणि आज (२२ ऑक्टोबर) टाकळी हाजी येथे आणखी एक अशा चार बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.
दरम्यान, १२ ऑक्टोबर रोजी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या शैलेश बोंबे (वय ५) या बालिकेचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला मृत्यूमुखी पडल्याने भीतीचे सावट आणखी गडद झाले आहे.
🔹 भय इथले संपत नाही…
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, जांबूत, टाकळी हाजी, मांडवगण फराटा, इनामगाव आदी भागात गेल्या काही वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यांत दहा हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये समृद्ध सचिन जोरी, पूजा नरवडे, पूजा जाधव, मुक्ताबाई खाडे, लक्ष्मीबाई भोईटे (९०), शिवतेज टेंभेकर (४), वस सिंग, रक्षा निकम, शिवन्या बोंबे आदींचा समावेश आहे.
कुत्रे, शेळ्या, मेंढ्या यांच्यावरही सातत्याने हल्ले होत आहेत. काही दिवस प्रशासन सक्रिय होत असले तरी परिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
बिबट्यांचा वाढता वावर : शिरूरमध्ये नवी धोक्याची घंटा
पूर्वी बिबट्यांचा वावर जुन्नर, आंबेगाव आणि खेड भागापुरता मर्यादित होता. मात्र, अलीकडच्या काळात शिरूर तालुक्यातही त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिंभा व चासकमान कालव्यांमुळे वाढलेले बागायती क्षेत्र, उसाचे प्रमाण, पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या रूपात सहज मिळणारे भक्ष्य हे बिबट्यांच्या वास्तव्यास पोषक ठरत असल्याचे बोलले जाते 
सध्या बिबट्यांचे वास्तव्य केवळ जांबूत, पिंपरखेडपुरते न राहता मांडवगण फराटा, इनामगाव, वडगाव रासाई, न्हावरा या पूर्व भागातही वाढले आहे. त्यामुळे शिरूर तालुका ‘बिबट्यांच्या वावराचा तालुका’ म्हणून ओळखला जाऊ लागल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
स्थानिक ग्रामस्थांनी या भागातील बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी तीव्र केली असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button