क्राईम

एम.डी. अंमली पदार्थासह आरोपी जेरबंद

एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त – गुन्हा नोंद

शिरूर, दि. १४ (टीम डेली न्यूज पोस्ट -२४) –
शहरातील युवकांना विळखा घालणाऱ्या घातक एम.डी. (मॅफेडॉन) अंमली पदार्थाच्या विक्रेत्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपीला रंगेहाथ पकडले. अॅक्टीव्हा स्कुटीसह एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पवन सागर भंडारे (वय १९, रा. वाडा कॉलनी, शिरूर) हा एम.डी. विक्रीसाठी नवीन शिरूर नगरपालिकेजवळ येणार आहे. ही खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी तात्काळ पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले.
पोलीस पथकाने नगरपालिकेसमोर सापळा लावला असता आरोपी स्कुटीवरून आल्याचे दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. अंगझडती दरम्यान त्याच्या खिशात प्लास्टिकच्या पुडीत २.८० ग्रॅम पांढऱ्या रंगाचा मॅफेडॉन अंमली पदार्थ सापडला. स्कुटीसह मुद्देमालाची एकूण किंमत ७२ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी गुन्हा रजि. नं. ६४७/२०२५, एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८(क), २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. दिपक करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे..

ही कारवाई पोलीस अधिक्षक  संदीप गिल अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेशकेंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात एपीआय दिपक करांडे, पीएसआय गोविंद खटींग, डीबी पथकाचे पीएसआय शुभम चव्हाण, हवालदार नितीन सुद्रीक, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, पवन तायडे, भाउसाहेब ठोसरे आणि अजय पाटील यांचा समावेश होता शिरूर पोलीस स्टेशनकडून अंमली पदार्थांच्या विरोधात या पुढील ही काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button