शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}प्रभू श्री रामलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरूर नगरीत सध्या ‘हर हर महादेव’चा जयघोष घुमू लागला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांच्या अमृतवाणीमधून रंगणाऱ्या भव्य श्री शिव महापुराण कथेच्या श्रवणासाठी राज्यासह देशभरातून भाविकांचे आगमन सुरू झाले आहे.
दि. २४ फेब्रुवारी ते २मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत हा दिव्य अध्यात्मिक सोहळा पार पडत आहे. या भव्य धार्मिक कार्यक्रमासाठी तब्बल ३० एकरांहून अधिक जागेवर सुसज्ज आणि भव्य मंडप उभारण्यात आला असून, हजारो भाविक एकाच वेळी बसून कथा श्रवण करू शकतील अशी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.
भव्य स्टेज, बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींचे आकर्षण
कथास्थळी उभारण्यात आलेले भव्य स्टेज आणि त्यावर साकारलेल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांच्या प्रतिकृती भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि आकर्षक सजावट संपूर्ण परिसराला आध्यात्मिक तेज प्रदान करत आहे. प्रवेशद्वारावरही भव्य शिवमूर्ती असून, संपूर्ण परिसरात शिवनामाचा गजर सुरू आहे.
लाखो भाविकांसाठी सुसज्ज नियोजन
या सोहळ्याचे आयोजन P. R. Dhariwal Foundation यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी मुख्य आयोजक प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल, उद्योगपती आदित्य धारीवाल आणि माजी नगरसेवक विजय दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे.
मंडपात पंखे, बसण्यासाठी मॅट्स, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची उभारणी तसेच मंडपालगत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर भोजन, स्वच्छता, आदरातिथ्य, पार्किंग आणि वाहतूक अशा विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. युवक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग या आयोजनाला बळ देत आहे.






