महाराष्ट्र

दूध खरेदी दरवाढीमुळे विक्री दरात वाढ; १ मार्चपासून नवे दर लागू

शिरूर ( डेली न्यूज पोस्ट टीम 24) : दूध खरेदी दरात प्रति लिटर ४ रुपयांनी वाढ झाल्यामुळे बाजारातील पाऊच (पिशवी) दूध विक्री दर वाढविणे अपरिहार्य ठरले आहे. त्यामुळे दि. १ मार्च २०२६ पासून गाय व म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिली.

संघाच्या सदस्यांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरी येथे पार पडली. या बैठकीस प्रमुख सहकारी व खाजगी २५ संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मागील महिनाभरात दूध खरेदी दरात प्रति लिटर ४ रुपयांनी वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यानुसार विक्री दरात वाढ करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. खरेदी दरात ४ रुपयांची वाढ असताना संघ पातळीवर २ रुपये आणि डीलर कमिशनमध्ये १ रुपया समायोजित करण्यात येणार असून ग्राहकांना केवळ २ रुपयांची वाढ लागू करण्यात येणार असल्याचे कुतवळ यांनी सांगितले.

दरम्यान, शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या (दूध, पनीर, तूप आदी) भेसळीबाबत तपासणी मोहीम सुरू केली आहे. तसेच लवकरच दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या वतीने अन्न व औषध आयुक्त, दुग्धविकास मंत्री तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button