शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}“आज लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव वाढले आहेत. तणावमुक्त जीवन जगलात तरच आनंद, प्रसन्नता आणि समाधान लाभेल,” असा जीवनमंत्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा (सीहोरवाले) यांनी दिला.
त्यांच्या अमृतवाणीतून रंगणाऱ्या श्री शिव महापुराण कथेसाठी शिरूर परिसरात अक्षरशः भक्तीचा महासागर उसळला आहे. दि. २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत रामलिंग रोडवरील भव्य स्थळी कथा रंगत असून, आज चौथ्या दिवसाचा सोहळा उत्साहात पार पडला. “हर हर महादेव” आणि “ॐ नमः शिवाय” च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
तणावमुक्तीचा सोपा मार्ग
प्रदीपजी मिश्रा म्हणाले, “भक्ती आणि श्रद्धा हवी, मन मोठं हवं. प्रेमाने सर्वांशी वागा. घरी आलेल्या पाहुण्याचे स्नेहपूर्वक स्वागत करा.”
दररोज एक बेलपान आणि एक तांब्या पाणी शिवलिंगास अर्पण करण्याचा साधा उपाय त्यांनी सांगितला. “चांगलं बोलणाऱ्यांची आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची प्रगती कोणी रोखू शकत नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“प्रत्येकाकडे वेळ कमी आहे, मन चंचल आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठा, स्नान करून दिवसाची सुरुवात करा. लवकर उठलात तर ताण, चिडचिड आणि राग कमी होईल,” असे ते म्हणाले. तणावमुक्त जीवनच आनंदमय जीवन घडवते, असे त्यांनी अधोरेखित केले.
श्रद्धेचा संदेश
“प्रदोषच्या दिवशी शंकर मंदिरात जाऊन दर्शन घ्या; ते शक्य नसेल तर मंदिराच्या शिखराचे दर्शन घ्या; तेही शक्य नसेल तर शिवभक्ताचे दर्शन घ्या,” असे सांगत त्यांनी प्रदोष व्रताचे महत्त्व स्पष्ट केले.
“शंकराचे एक नाव आशुतोष आहे. प्रामाणिक भावनेने केलेला नमस्कारही भगवान स्वीकारतात. जीवन हसत-खेळत जगा; हसू शकतो तो फक्त माणूसच,” असा हृदयस्पर्शी संदेश त्यांनी दिला.
सकारात्मक राहा, प्रसन्न राहा व हसतमुख राहा चांगले विचार करा असे ही ते म्हणाले. प्रसन्नता, दृढता व श्रद्धा जीवनात राहू द्या. श्रद्धा व सबुरी महत्वाची आहे. काहीना भक्तीचे श्रद्धेचे फळ लगेच हवे असते. लक्षात घ्या मुलास जन्म घेण्यासाठी ९ महिन्याचा काळावधी लागतो. बियाण्यास ही अंकुरण्यास काही काळावधी लागतो. परमेश्वरावर भरोसा ठेवा, थोडी सबुरी ठेवा निश्चितच भगवान शंकर चांगले फळ देईल असे ते म्हणाले.
या सोहळ्यास माजी मंत्री बबनराव पाचपुते,आयोजक उद्योगपती प्रकाश धारिवाल, आदित्य धारिवाल, दिनाभाभी धारिवाल, साक्षी धारिवाल, सुनील धाडीवाल,माजी नगरसेवक विजय दुगड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरूरमध्ये सुरू असलेल्या या अध्यात्मिक सोहळ्याने भक्तांच्या मनात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित केली असून, तणावग्रस्त जीवनात शांततेचा आणि समाधानाचा नवा किरण दाखविला आहे. “हर हर महादेव” च्या गजरात भक्ती, भावना आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे.