विशेष
शिरूर शहरात बिबटयाचे दर्शन. बिबटया जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम -24}: शिरूर शहरातील नदीकाठी असणाऱ्या अमरधाम, सुशीला पार्क, सूरज नगर परिसरात कालपासून बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहराच्या हद्दीतचl हा बिबट्या फिरत असल्याची माहिती समोर आल्यानंतर वन विभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, वन विभागाच्या वतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सूरज नगर परिसरात पिंजरा लावण्यात आल्याची माहिती शिरूर तालुका वनाधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या वावरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. दहा दिवसांपूर्वीच जांबूत (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७२) यांचा मृत्यू झाला होता.
त्यापूर्वी पिंपरखेड येथील शिवन्या बोबे या साडेपाच वर्षांच्या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आतापर्यंत शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे १० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे.

विशेषत: नदीकाठी रात्रीच्या वेळी व पहाटे बिबट्या फिरत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

शहरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असले तरी वन विभाग आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांतून लवकरच बिबट्याला जेरबंद केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.