Uncategorized
चंद्रकांत बाफना यांच्या निधनाने सुसंस्कृत व अभ्यासू नेतृत्व हरपले.
शोकाकुल वातावरणात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

शिरूर :{डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील प्रसिद्ध व्यापारी, प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी तसेच शिरूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत सोभाचंद बाफना (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 
त्यांच्या निधनाने शिरूरच्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक जीवनातील सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यविधीप्रसंगी माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा काँग्रेस आयचे नेते देविदास भन्साळी, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, माजी सचिव तुळशीराम परदेशी, जैन संघाचे सुभाष ललवाणी, माजी नगरसेवक डॉ. धनराज सुराणा,
भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल बाबुराव पाचर्णे, पांडुरंग थोरात, विजय बाठिया, माजी सरपंच जगन्नाथ पाचर्णे आदींनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.बाफना हे अजातशत्रू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. कोणालाही न दुखावता सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. शिरूरमधील शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते पदाधिकारी होते संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही काम पाहिले. तसेच ते जैन विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य होते, तर सकल ओसवाल जैन समाजाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
अभ्यासू, सुसंस्कृत आणि समतोल विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. शिरूर शहराजवळील त्यांच्या शेतीत ते शेतीविषयक विविध प्रयोग करत असत. त्यांच्या प्रयोगशील शेतीची माहिती घेण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत असत. ते लायन्स क्लब ऑफ शिरूरचे माजी अध्यक्षही होते. विविध विषयांवरील त्यांचे सखोल वाचन आणि अभ्यास यासाठीही ते परिचित होते.

त्यांच्या पश्चात व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाफना, बांधकाम व्यावसायिक संजय बाफना, मंगल अनिल धाडीवाल व किरण बरडिया ही अपत्ये, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी मंत्री मदन बाफना यांचे ते बंधू, तर ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफना यांचे ते सासरे होत. त्यांच्या कार्याचा आणि अभ्यासूपणाचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
अंत्यसंस्कार प्रसंगी प्राचार्य डॉ. के. सी मोहिते, उद्योजक डॉ. प्रा. राजेराम घावटे, पंचायत समितीचे माजी सदस्य आबासाहेब सरोदे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांच्या सह राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
