ज्ञानगंगा गुरुकुलचा जागतिक विक्रम; १,११,१११ सूर्यनमस्कारांची इंटरनॅशनल रेकॉर्ड मध्ये नोंद
शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम,-24}ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, सातत्य आणि शिस्तीच्या बळावर जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली आहे. शिरूर येथील ज्ञानगंगा गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल १ लाख ११ हजार १११ सूर्यनमस्कारांचा अभूतपूर्व विक्रम करत इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.
२५ जानेवारी ‘जागतिक सूर्यनमस्कार दिना’चे औचित्य साधत गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी हा विक्रम साध्य केला. प्रत्येक विद्यार्थ्याने सुमारे १००० सूर्यनमस्कार घालत या उपक्रमात सहभाग नोंदवला. दररोज सकाळी एक तास नियमित योगसाधना, संतुलित आहार आणि ध्यानधारणा या त्रिसूत्रीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.

या यशामागे गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेराम घावटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ज्ञानप्रबोधिनी, निगडी यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. भाऊसाहेब पाचुंदकर, डॉ. संदीप कोकरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
उपाध्यक्ष दीपक घावटे, सचिव साविताताई घावटे, खजिनदार सुधीर शिंदे, संचालिका अमृतेश्वरी घावटे, प्राचार्य गौरव खुटाळ, प्रशासक शिशिर जगताप, मुख्याध्यापिका सुनंदा लंघे, गुरुकुल प्रमुख जयश्री खणसे, समन्वयक व्ही. डी. शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.
शिरूरसारख्या ग्रामीण भागात सकाळी ७ ते संध्याकाळी ७ अशी व्यक्तिमत्व विकासावर भर देणारी शाळा सुरू झाल्याने भविष्यात सुसंस्कारित आणि आदर्श विद्यार्थी घडतील, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला. नियमित साधना आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच हे यश मिळाल्याचे मतही व्यक्त होत आहे.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मनोदय गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेराम घावटे यांनी यावेळी व्यक्त केला.
