Uncategorizedधार्मिंकराष्ट्रीयविशेष

शिरूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त शाळांमध्ये भक्तिमय दिंडी सोहळ्यांचा उत्साह

वारकरी परंपरा, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा विद्यार्थ्यांना परिचय

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आषाढी एकादशीनिमित्त शिरूर शहरातील विविध शाळांमध्ये भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले. वारकरी वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष, अभंग, भक्तिगीते, रिंगण सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची परंपरा, भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची ओळख करून देण्यात आली.

आर. एम. धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत दिंडी काढली. रिंगण सोहळा, श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे स्वागत आणि महाआरतीनंतर विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिमय नृत्य, फुगडी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्री-प्रायमरी विभागाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची आकर्षक प्रतिकृती उभारत वारकरी संस्कृतीची झलक साकारली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठलांची प्रतिमा आणि “माऊली” या शब्दाची अक्षररचना करून अनोखा उपक्रम राबविला.यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे , उपनगराध्यक्ष मितेश गादिया, सभापती डॉ. सुनिता पोटे,  सभापती आयेशा सय्यद, उपसभापती स्वप्ननाली जामदार शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, शाळा समितीचे अध्यक्ष शिरीषकुमार बरमेचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे  यांनी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. “वारी स्वच्छतेची” हा संदेश देत त्यांनी शाळेतील स्वच्छता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचेही कौतुक केले.

न्यू इंग्लिश स्कूलमध्येही “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”च्या जयघोषात भक्तिमय दिंडी काढण्यात आली. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दिंडीत उत्साहाने सहभाग घेतला. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण, मुख्याध्यापक संजय मचाले, पर्यवेक्षक अण्णासाहेब सरोदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई ) आणि बालाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. रामलिंग रोडवरून निघालेली दिंडी हलवाई चौकात पोहोचल्यानंतर पालखीचे स्वागत व महाआरती करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचरणे, संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पाटील यांच्या पत्नी वर्षा पाटील,माजी सरपंच विठ्ठल घावटे,सभापती डॉ. सुनिता पोटे, स्वाती साठे, आयेशा सय्यद, नगरसेविका  पूजा पोटावळे, सुनीता भुजबळ, चारुशीला कोळपकर, संगीता मल्लाव, नगरसेवक सागर नरवडे, उमेश शेळके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे,  माजी उपसभापती प्रवीण गायकवाड, हलवाई चौक गणेश मित्र मंडळ अध्यक्ष  अशोक काळे, मुख्याध्यापक विनायक म्हसवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

हलवाई चौक गणेश मित्र मंडळ आणि सुवर्णा ज्वेलर्स यांच्या वतीने बाल वारकऱ्यांना फराळी चिवडा व केळीचे वाटप करण्यात आले.

विद्याधाम प्रशाला प्राथमिक शाळेतही आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. भजन, विठ्ठलनामाचा गजर आणि रिंगण सोहळ्याने वातावरण भक्तिमय झाले. यावेळी धरमचंद फुलफगर, चंदूलाल चोरडिया, प्रकाश बाफना, शिरीष बरमेचा, मुख्याध्यापिका ज्योती मुळे आणि अश्विनी घारू उपस्थित होत्या.

डेक्कन इंग्लिश मीडियम स्कूल तसेच शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथेही आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

शहरातील विविध शाळांमध्ये पार पडलेल्या या दिंडी सोहळ्यांमुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, भारतीय संस्कृती, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामूहिक सहभाग आणि सामाजिक मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. पालक आणि नागरिकांनीही या उपक्रमांचे उत्स्फूर्त स्वागत करत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button