शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}विद्यार्थी, शिक्षण, विवेकवाद आणि समाजप्रबोधन यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे कृतिशील शिक्षणतज्ज्ञ, ज्येष्ठ विवेकवादी विचारवंत आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राचार्य सीताराम गोसावी यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीतील अभ्यासू, संवेदनशील आणि कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली.
oplus_131074
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राचार्य गोसावी यांचे निधन झाल्यानंतर शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि पुरोगामी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित सभेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण आदरांजली वाहिली.
प्राचार्य गोसावी यांनी आयुष्यभर शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद आणि सामाजिक परिवर्तनासाठी अविरत कार्य केले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांत सुमारे २० वर्षे उपक्रमशील प्राचार्य म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. विशेषतः वंचित ,निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर व बारामती शहर शाखेचे अध्यक्ष म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करत अंधश्रद्धेविरोधातील चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानांमुळे आणि स्पष्ट विचारांमुळे ते राज्यभर परिचित होते.त्यांचे इच्छेनुसार देहदान करण्यात आले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे प्रमुख प्रा. डॉ. संदीप सांगळे म्हणाले की, “प्राचार्य गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मानवता, बंधुता आणि विवेकाचा विचार दिला. समाजावर निरागस प्रेम करत त्यांनी प्रबोधनाची बीजे आयुष्यभर पेरली.”
प्रा. प्रभाकर घेरे यांनी त्यांच्या ग्रामीण साहित्य आणि दलित चळवळीवरील अभ्यासाचा गौरव केला. टी. सी. कॉलेजच्या कला विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. सीमा नाईक- गोसावी यांनी प्राचार्य गोसावी यांच्या अप्रकाशित कवितासंग्रह लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
डॉ.रंजना नेमाडे यांनी त्यांच्या शिक्षणाविषयीच्या तळमळीचा उल्लेख करत समाजातील आणि कुटुंबातील महिलांना शिक्षणासाठी त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवण करून दिली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी म्हणाले, “त्यांचे पारदर्शी, निर्मळ आणि विचारशील व्यक्तिमत्त्व अनेकांना प्रेरणा देणारे होते. त्यांनी विद्यार्थी आणि समाजासाठी आयुष्य झिजवले. त्यांचे विचार कायम दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करत राहतील.”
डॉ. राजाभाऊ भैलूमे यांनी ज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात त्यांनी अढळ स्थान निर्माण केल्याचे सांगितले. “रयत शिक्षण संस्थेच्या औंध, सोलापूर, पंढरपूर, मलकापूर ,शिरवळ येथील रयतेच्या विविध महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करताना गोसावी सरांनी त्या-त्या परिसरातील वंचित, गोरगरीब, आणि शिक्षणापासून दूर असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. प्राचार्य सीताराम गोसावी सरांच्या रूपाने रयत शिक्षण संस्थेला एक अनमोल हिरा मिळाला होता.” असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांनी केले.
टी.सी. कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अरुण मगर, प्राचार्य डॉ.संजय घोडेकर, डॉ. सुधाकर शेलार, डॉ. शिवाजी एंडाईत, डॉ.आनंदा गांगुर्डे, डॉ. श्रीराम गडकर, बलजिंदर कौर सेखो, माजी प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर, डॉ.सुनील खामगळ ,प्रा. छाया लोखंडे, प्रा. देविदास गिरी, प्रा. सोमनाथ कदम, दिलीप पालीवाल बारामती अंनिसचे हिंगसे अप्पा, प्रा. रजनी सुर्वे यांनीही मनोगते व्यक्त केली.
प्राचार्य गोसावी यांची नात सप्तमी पैठणकर यांनी आजोबांच्या स्मृतींना उजाळा दिला.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी प्राचार्य सीताराम गोसावी यांची समाजप्रबोधनाची परंपरा, विवेकवादाची मशाल आणि शिक्षणासाठीचे समर्पित कार्य पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील, असा दृढ विश्वास व्यक्त केला. त्यांच्या रूपाने समाजाने केवळ एक प्राचार्य नव्हे, तर विचारांची ज्योत तेवत ठेवणारा खरा समाजशिक्षक गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आली.यावेळी प्राचार्य सीताराम गोसावी यांच्या कार्याला अभिवादन म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रकाशित विविध विषयांवरील १५० पुस्तिकांचे वाटप उपस्थितांना करण्यात आले. प्राचार्य सिताराम गोसावी यांच्या कन्या डॉ. प्रा. क्रांती पैठणकर या शिरूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरूरच्या कार्याध्यक्ष असून चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे त्याचबरोबर रसिक विचार मंच यांच्याही सदस्या आहेत.