Uncategorized

करडेतील गोळीबार प्रकरणाचा ७२ तासांत छडा; पाच आरोपी जेरबंद, दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: करडे (ता. शिरूर) येथे सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना शिरूर पोलिसांच्या डीबी पथकाने अवघ्या ७२ तासांत परजिल्ह्यातून अटक केली. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता करडे गावातील हनुमान मंदिराच्या पाठीमागे भैरवनाथ मंदिराजवळील तलाव परिसरात जुने वैमनस्यातून हा प्रकार घडला. आरोपींनी निखिल सतीश थेऊरकर (वय २३, रा. करडे) याला शिवीगाळ व दमदाटी करत पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६६९/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता..

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सुपा (ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डीबी पथकाने सापळा रचून अथर्व उर्फ टिन्या रावसाहेब शेळके (१९), रोहन उर्फ दादया गणेश पंचमुख (१९), अदित्य दशरथ लंघे (१९), निखिल विलास कायस्थ (१९) आणि सनी परमेश्वर मस्के (२०) यांना ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यात दोन विधीसंघर्षित बालकांचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.

तपासात अथर्व उर्फ टिन्या शेळके आणि रोहन उर्फ दादया पंचमुख हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे, बेकायदा जमाव जमविणे व मारहाण यांसारखे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, या प्रकरणातील फिर्यादी निखिल थेऊरकर याच्यावरही शिरूर, रांजणगाव एमआयडीसी आणि परभणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्र बाळगणे व गंभीर मारहाण यांसारखे पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीने यापूर्वी आरोपी व विधीसंघर्षित बालकांना मारहाण केल्याच्या रागातून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राकेश मुळीक, पोलीस हवालदार अक्षय कळमकर, शरद वारे, राहुल भवर तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखिल रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button