शिरूरमध्ये गोळीबारात व्यापारी जखमी; १२ वर्षांच्या मुलीलाही मारहाण
आनंद सोसायटीतील धक्कादायक घटना; घरफोडी करून चोरट्याचा गोळीबार, परिसरात खळबळ
शिरूरमध्ये गोळीबारात व्यापारी जखमी; १२ वर्षांच्या मुलीलाही मारहाण
आनंद सोसायटीतील धक्कादायक घटना; घरफोडी करून चोरट्याचा गोळीबार, परिसरात खळबळ
शिरूर : शहरातील आनंद सोसायटी परिसरात घरात शिरलेल्या चोरट्याला प्रतिकार करताना व्यापारी उमेश छाजेड (वय ४५) हे गोळीबारात गंभीर जखमी झाले. वडिलांना वाचविण्यासाठी चोरट्याशी प्रतिकार करणारी त्यांची १२ वर्षांची मुलगी मानवी हिलाही चोरट्याने मारहाण केली. या घटनेत तिच्या हाताला दुखापत झाली. शुक्रवारी (दि. १६) पहाटे सव्वाचारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश छाजेड हे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या बंगल्यात प्रवेश केला. घरात चोर शिरल्याचे लक्षात येताच छाजेड तातडीने पुन्हा बंगल्यात आले. यावेळी त्यांची चोरट्याशी झटापट झाली. त्यातून चोरट्याने केलेल्या गोळीबारात छाजेड गंभीर जखमी झाले.
दरम्यान, वडिलांना वाचविण्यासाठी मानवी हिनेही चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्याने तिलाही मारहाण केली. या झटापटीत तिच्या हाताला दुखापत झाली.
या घटनेपूर्वी चोरट्याने अजित ओस्तवाल यांच्या बंगल्याच्या बाल्कनीतून घरात प्रवेश करून कपाट फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. एकाच परिसरात घरफोडी आणि त्यानंतर गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेतील संशयित चोरट्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.