शिरुर रामलिंग ग्रामपंचायत कर्मचारी यांचे काम बंद आंदोलन
पाणी पुरवठा योजनेचे काम करीत असताना ग्रामपंचायत कर्मचारास मारहाण. पोलीसाचे कारवाईचे आश्वासना नंतर काम बंद आंदोलन मागे

शिरुर ( डेली न्यूज पोस्ट टीम -24) शिरुर ग्रामीण रामलिंग ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असताना ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश माणिक कु-हाडे वय -४१ यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करत ग्रामपंचायत कर्मचारांनी काम बंद आंदोलन सुरु केले.
मारहाण करणाराच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिल्यावर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले .
याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोन च्या सुमारास श्रीनिवास सोसायटी, रामलिंग रोड ता. शिरुर ,जि. पुणे येथे ग्रामपंचायत शिरुर ग्रामीणचे पाणी पुरवठा विभागाचे अंकुश कु-हाडे हे नळ पाणीपुरवठ्याचा कामासाठी जेसीबीच्या साहाय्याने चारी खोदण्याचे शासकीय काम करीत असताना अमित जयंत डोंगरे रा. श्रीनिवास सोसायटी, रामलिंग रोड ता. शिरुर जि. पुणे याने त्याचे घराच्या पार्कीग समोरील पाईपचे का काम केले नाही म्हणुन कु-हाडे व जेसीबी सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे रा. देवदैठण ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यास शासकीय काम करीत असताना अडथळा आणला व कु-हाडे यांच्या कंबरेत, मानेवर दगडाने मारहाण करुन दुखापत केली तसेच सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे यास हाताने डोक्यात, पाठीत मारहाण करुन त्याला सोसायटीतील प्रत्येक घरा समोर उठाबश्या मारण्यास लावले तसेच मोटर सायकल क्र. एम. एच. १२ सी. झेड. ९६२३ ला दगडाने ठेचुन नुकसान केले .
शासकिय कामास अडथळा केला म्हणून डोंगरे यांच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात कु-हाडे यांनी तक्रार दिली आहे .
दरम्यान शिरुर रामलिंग ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागातील अंकुश कु-हाडे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करुन ग्रामपंचायतीच्या ३० हून आधिक कर्मचारांनी मारहाण केलेल्याचा विरोधात कारवाई करण्याची मागणी करीत आज दि. ३ एप्रिल पासुन काम बंद आंदोलन सुरु केले होते .
या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी यासाठी शिरुर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड , उप सरपंच बाबाजी वर्पे व माजी सरपंच अरुण घावटे , विठ्ठल घावटे , माजी उपसरपंच भरत बो-हाडे व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली . यावेळी रामलिंग रोड कॉलनीतील स्थानिक महिलाही ही उपस्थित होत्या .
पोलीस उपविभागीय आधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी संबधिंतावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले .
या आश्वसनानंतर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले .