राष्ट्रीय

उच्च शिक्षणाने कौशल्यपूर्ण व जबाबदार नागरिक घडवले पाहिजेत : डॉ. पंडित विद्यासागर

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार उच्च शिक्षणाची उद्दिष्टे बदलणे ही काळाची गरज असून केवळ पदव्या देण्यापेक्षा सामाजिकदृष्ट्या जबाबदार, कौशल्यसंपन्न आणि पर्यावरणाबाबत जागरूक नागरिक घडविणे हेच उच्च शिक्षणाचे खरे ध्येय असले पाहिजे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सी. टी. बोरा महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उच्च शिक्षण आणि शाश्वत विकास” या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी शिरूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष धरमचंद फुलपगार, सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, आयआयएसईआरचे संचालक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातु, विक्रम सिंहापुरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) अल्लम श्रीनिवास राव, एच. एस. गौर विद्यापीठ (सागर) येथील मदन मोहन मालवीय टीचर ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. आर. टी. बेदरे, उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. विद्यासागर यांनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांवर (SDGs) प्रकाश टाकत गरिबी निर्मूलन, भूकमुक्ती, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता आणि स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शाश्वत विकासासाठी केवळ ज्ञान पुरेसे नसून कौशल्यसंपन्न मनुष्यबळ घडविणे ही महाविद्यालयांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. पारंपरिक ‘खडू-फळा’ पद्धतीऐवजी नाविन्यपूर्ण अध्यापन आणि अनुभवात्मक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. नालंदा आणि तक्षशिला यांसारख्या प्राचीन भारतीय विद्यापीठांच्या परंपरेचा वारसा पुढे नेण्याचेही त्यांनी आवाहन केले.

प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी स्वागत करत महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पस उपक्रमांची माहिती दिली. डॉ. एस. बी. भोईटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी परिषदेच्या शोधनिबंध संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

पहिल्या दिवशी विक्रम सिंहापुरी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) अल्लम श्रीनिवास राव यांनी बीजभाषणात नालंदा व तक्षशिला विद्यापीठांचा संदर्भ देत भारताच्या शैक्षणिक वारशाचा गौरव केला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातु यांनी शाश्वत विकासाला ‘चिरंतन’ संकल्पना संबोधत ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेवर भर दिला. डॉ. आर. टी. बेदरे यांनी ज्ञानेश्वरीतील ‘पसायदान’ आणि पर्यावरण संतुलनाचा संबंध स्पष्ट केला. सचिव नंदकुमार निकम यांनी उच्च शिक्षण व शाश्वत विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात धरमचंद फुलपगार यांनी शिक्षण मंडळाची संशोधनाभिमुख भूमिका स्पष्ट केली.दुपारच्या सत्रात विविध राज्यांतील संशोधकांनी शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण केले.

दुसऱ्या दिवशी आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी उच्च शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि भविष्यातील संधी यांवर मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि शाश्वत विकास याविषयी सविस्तर विवेचन केले. “उच्च शिक्षण बदलले तरच राष्ट्र बदलेल,” असे सांगत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास ध्येयांची माहिती दिली. महाविद्यालयांनी ‘इन्स्टिट्यूशनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’च्या माध्यमातून समाजाशी जोडले जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आदरणीय प्रकाशजी रसिकलालजी धारिवाल यांना डेली न्यूज पोस्ट टीम २४ च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परिषदेचा समारोप डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, समन्वयक डॉ. अतुल जेठे, आयोजन सचिव डॉ. सुनील भोईटे, डॉ. रमेश भिसे आदी उपस्थित होते. सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीपाद जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल जेठे यांनी केले. देशभरातील संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा परिषदेतील सहभाग लक्षणीय होता.

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी बाफना यांना डेली न्यूज पोस्ट 24 च्या वतीने भावपूर्ण आदरांजली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button