शिरूर (डेली न्यूज पोस्ट टीम -24) – शिरूर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणा-या एका आरोपीस ताब्यात घेऊन तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २२ जुलै) रात्री शिरूर बायपास परिसरात करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात व सचिन भोई हे शहरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की लाल रंगाच्या स्विफ्ट कार (MH-16-DG-5597) मधून गुटखा विक्रीसाठी आणला जात आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना कळवून त्यांनी तातडीने छापा मारण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पथकाने रिलायन्स जिओ पंपाजवळ सापळा रचून कार ताब्यात घेतली. तपासात अरबाज हबीब शेख (वय १९, रा. सुपा, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हा तरुण मिळून आला. कारची तपासणी केली असता गोवा पान मसाला व तंबाखूचा अंदाजे ५२,५०० रुपयांचा गुटखा आढळला. तसेच ५ लाखांची स्विफ्ट कार मिळून एकूण ५.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तपास पथकात नाथसाहेब जगताप, विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ, निखील रावडे, रविंद्र आव्हाड व अजय पाटील यांचा समावेश होता.