शिरुर, ( डेली न्यूज पोस्ट टीम -24)
न्हावरा येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मल्लिकार्जून विद्यालयाच्या १९७५ सालच्या एसएससीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा आपला वर्ग भरवला.
या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देताना सर्व उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी भारावून गेले होते.
या कार्यक्रमात शिवाजी राजे निंबाळकर गुरुजी, दत्तात्रेय राजे निंबाळकर गुरुजी, विजयकुमार गोरे, शिवले सर, खोपडे सर, निलावंती सरके, कुसुम जगताप, उषा चौधरी, सुशिला कोरेकर, वेताळ ताई, तसेच पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ कदम यांच्यासह ६५ विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, सरस्वती पूजन आणि प्रार्थनेने झाली. राष्ट्रगीत राम धुमाळ (आलेगाव) यांनी सादर केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. बालपणीचे मित्र-मैत्रिणी आपल्या कार्यक्षेत्रात किती पुढे गेले आहेत, हे पाहून सर्वांनाच आनंद झाला.विजयकुमार गोरे, उषा चौधरी, दत्तात्रेय निंबाळकर, शिवाजीराजे निंबाळकर आणि ज्ञानदेव काळे यांनी यावेळी आपल्या मनोगतातून आठवणी, भावना आणि कृतज्ञता व्यक्त केली.
पाच दशकांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाच्या शेवटी, दरवर्षी असेच एकत्र येण्याचा संकल्प करत विद्यार्थ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला .



