“स्वच्छ शिरूर – हरित शिरूर” या संकल्पनेखाली शिरूर नगरपरिषदेच्या वतीने यंदा राबविण्यात आलेली पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जन मोहीम राबविण्यात आली.३९६ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलकुंडांमध्ये करण्यात आले. तर ३ टन निर्माल्य संकलित करण्यात आल्याची माहिती शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.
शहरात यंदा ७ ठिकाणी कृत्रिम विसर्जन जलकुंडांची सोय करण्यात आली होती. शनी मंदिराजवळील श्री. गणपती विसर्जन घाट, दशक्रिया विधी केंद्राशेजारील घाट आणि रयत शाळेचे मैदान अशा ठिकाणी नागरिकांसाठी ही सोय उपलब्ध होती.
३९६ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम जलकुंडांमध्ये करण्यात आले. काही भक्तांनी तुरटीच्या मूर्तींचे थेट नदीमध्ये विसर्जन करून नदी स्वच्छतेस हातभार लावला. पालिकेच्या निर्माल्य संकलन केंद्रात ३ टन निर्माल्य संकलित करण्यात आले असून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे.
शिरूर नगरपरिषद आणि टोफी होम फूड डिलिव्हरी ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने घरापासून विसर्जन घाटापर्यंत मोफत वाहन सुविधा देण्यात आली होती.
गणेश विसर्जनाच्या दिवशी शिरूर नगरपरिषदेचे १३९ कर्मचारी तीन शिफ्टमध्ये, पॉलिमर इंडिया प्रा. लि. एमआयडीसी चे ८५ कर्मचारी, वात्सल्य सिंधू फाउंडेशनचे स्वयंसेवक आणि पोलिस अधिकारी कर्मचारी विसर्जन सोहळ्या साठी कार्यरत होते.
उपक्रमात विशेष योगदानाबद्दल नगरपरिषदेतर्फे पॉलिमर इंडिया प्रा. लि. आणि वात्सल्य सिंधू फाउंडेशन यांना “पर्यावरण दूत” प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कृत्रिम जलकुंड मध्ये श्री. गणेश मुर्त्यांचे विसर्जन करणारा नागरिकांनाही “पर्यावरण दूत” प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श प्रीतम पाटील यांनी सर्व नागरिकांचे अभिनंदन करून आभार मानले. “आगामी वर्षांमध्येही पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा जोपासून पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्तींची प्रथा वाढवावी,” असे आवाहन त्यांनी केले.नगरपरिषद पुढील वर्षी हा उपक्रम आणखी व्यापक करण्यासाठी विशेष योजना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.