क्राईम

२४ लाखांच्या चोरीचा उलगडा; नोकराला नांदेडमधून अटक, सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}आनंद सोसायटी परिसरातील घरफोडी करून तब्बल २४ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या नोकराला शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने नांदेड जिल्ह्यातून अटक केली. आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने या गाजलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.याबाबत नितीन मोतीलाल मुथ्था (रा. आनंद सोसायटी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या घरात काम करणारे विलास आनंदा खोसडे व सारजा विलास खोसडे (दोघेही रा. भायेगाव, जि. नांदेड) यांनी ४ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरातील सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी व अन्य मौल्यवान साहित्य लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३०६ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला आरोपींचा व चोरीच्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले.

तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू असताना मुख्य आरोपी विलास आनंदा खोसडे हा मुखेड तालुक्यातील जांब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नांदेड जिल्ह्यात जाऊन सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे २४ लाख रुपये किमतीचे ७ किलो १३४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व वस्तू तसेच ३६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. चोरीचा जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभमकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह अक्षय कळमकर, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अंबादास थोरे, रविंद्र काळे, दादाराव नागरे आणि अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button