विशेषशैक्षणिक

उद्योग व्यवसायात झोकून देऊन काम करा व अडचणींना धैर्याने सामोरे जा यश तुम्हाला नक्की मिळेल : उद्योजक प्रकाश कुतवळ

उद्योजकता कार्यशाळेत प्रतिपादन

उद्योजकता कार्यशाळेत मार्गदर्शन प्रसंगी उद्योजक प्रकाश कुतवळ

शिरूर (वार्ताहर) –
“झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करा, अडचणींना न घाबरता त्यांचा सामना करा  यश तुम्हाला नक्की मिळेल ,” असा  संदेश कुतवळ फूड्स प्रा. लि. चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कुतवळ यांनी विद्यार्थ्यांना दिला.
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात “उद्योजकता – एक आत्मनिर्भरतेकडे प्रवास” या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते.
या कार्यशाळेस शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व 157 विद्यार्थी उपस्थित होते.
कुतवळ यांनी आपल्या उद्योजकतेच्या प्रवासातील चढ-उतार विद्यार्थ्यांसमोर मांडत, यशस्वी उद्योजक होण्यासाठी पंचसूत्री, योग्य निर्णयक्षमता, आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली.
“व्यवसायामध्ये ठाम राहणे आणि परिस्थितीशी जुळवून घेत नवे प्रयोग करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असे कुतवळ म्हणाले.
सचिव नंदकुमार निकम यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होऊन रोजगार निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. मोहिते यांनी जनरेशन झेड आणि गो वेगण सारख्या नव्या संकल्पनांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना नव्या कल्पनांच्या जोरावर व्यवसाय संधी शोधून रोजगार निर्माते बनण्याचे आवाहन केले.
वाणिज्य विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका करपे यांनी व्यवसाय लहान असो वा मोठा, त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे आणि प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची चिकाटी आत्मसात करण्याचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button