राष्ट्रीयविशेष

शिरूर मध्ये श्री. शिव महापुराण कथा सोहळ्यात समस्त सकल मराठा समाज संघ घोडनदीकडून रुग्णवाहिका सेवा

शिरूर  {डेली न्यूज पोस्ट टीम 24}: प्रभू श्री रामलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिरूर नगरीत सध्या ‘हर हर महादेव’चा जयघोष दुमदुमत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पं. आचार्य प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीमधून रंगणाऱ्या भव्य श्री शिव महापुराण कथेच्या श्रवणासाठी राज्यासह देशभरातून भाविकांचे लोंढे शिरूरकडे वळत आहेत.

दि. २४ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत हा दिव्य अध्यात्मिक सोहळा पार पडत आहे. तब्बल ३० एकरांहून अधिक जागेवर उभारण्यात आलेल्या सुसज्ज आणि भव्य मंडपात लाखो भाविक एकाच वेळी बसून कथा श्रवण करू शकतील अशी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम अनुभवायला मिळत आहे.

भाविकांच्या सेवेसाठी आरोग्य सुविधा सज्ज

लाखो भाविकांच्या उपस्थितीची दखल घेत विविध मूलभूत सुविधा सज्ज करण्यात आल्या असून आरोग्य सेवेवर विशेष भर देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समस्त सकल मराठा समाज संघ, घोडनदी यांच्या वतीने सात दिवसांसाठी २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही रुग्णवाहिका कथा सोहळ्यादरम्यान सतत कार्यरत राहणार असून आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. कोरोनाच्या काळात परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आणण्यात आलेली ही रुग्णवाहिका आज पुन्हा एकदा समाजसेवेच्या कार्यात पुढे सरसावली आहे, ही विशेष बाब मानली जात आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत सेवा समर्पित

 सोहळ्याचे प्रमुख संयोजक प्रसिद्ध उद्योगपती व प्रसिद्ध उद्योगपती व माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या कडे ही रुग्णवाहिका सुपूर्त करण्यात आली. यावेळी समाजाचे विश्वस्त प्रा. सतीश धुमाळ, संजय बारवकर , रमेश दसगुडे, योगेश महाजन, नगरसेवक सागर नरवडे, अनिल घावटे, गणेश खोले, नगरसेवक अभिजित पाचर्णे,  शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, किरण पठारे, माजी सरपंच अरुण घावटे, रुग्णवाहिकेची व्यवस्था पाहणारे डॉ. संतोष पोटे, व्यवसायिक सुनील धाडीवाल,  आदित्य पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद धाडीवाल,  मातोश्री प्रतिष्ठानचे अभिजित आंबेकर, समस्त माहेश्वरी समाज शिरूरचे संदीप बिहाणी, अस्लम सय्यद, रवि आढाव, फिरोज शिकलकर,  हलवाई चौक गणेश मित्र मंडळचे अध्यक्ष अशोक काळे, माजी सभापती संतोष शितोळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “हा कार्यक्रम समस्त शिरूरकरांचा आहे. तो यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन केले.

शिरूर पंचक्रोशी भक्तिमय वातावरणात

शिरूर पंचक्रोशीमध्ये हा भव्य दिव्य धार्मिक सोहळा संपन्न होत असून लाखो भाविकांच्या स्वागतासाठी शिरूरकर सज्ज झाले आहेत. भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे.

अवघे शिरूर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमत असून, श्रद्धा आणि सेवाभावाचा हा महोत्सव प्रेरणादायी ठरत आहे. 🔱

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button