देशाच्या स्वातंत्र्यासाठी२७व्या वर्षी प्राणार्पण करणारे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे देशप्रेम, त्याग, संघटनकौशल्य आणि ध्येयनिष्ठेचे प्रेरणादायी प्रतीक : प्रा. डॉ. अंबादास केत
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम -24}देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी प्राणार्पण करणारे हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे हे देशप्रेम, त्याग, संघटनकौशल्य आणि ध्येयनिष्ठेचे प्रेरणादायी प्रतीक आहेत,” असे सी.टी. बोरा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अंबादास केत म्हणाले.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या ११०व्या स्मृतिदिनानिमित्त शिरूर रिक्रिएशन क्लब अँड लायब्ररी संचालित मुक्तद्वार वाचनालय व सी.टी. बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या ११०व्या स्मृतिदिनानिमित्त रिक्रिएशन क्लब अँड लायब्ररी संचालित मुक्तद्वार वाचनालय व सी.टी. बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे ‘या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद हुसेन पटेल होते.
डॉ. केत यांनी पिंगळे यांच्या जीवनप्रवासाचा ऐतिहासिक पट उलगडला. शालेय जीवनात रुजलेले राष्ट्रभक्तीचे संस्कार, समर्थ विद्यालयातील राष्ट्रीय शिक्षणाचा प्रभाव, मुंबईतील नोकरीदरम्यान मिळालेले बॉम्बनिर्मितीचे तंत्र—या सर्व घटकांनी त्यांच्यातील क्रांतिकारी घडत गेला.
उच्च शिक्षणासाठी विदेशात गेल्यानंतर पिंगळे गदर पक्षाशी जोडले गेले. गदरचे लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे या विचारवंतांचा सहवास आणि गदर मुखपत्रातील क्रांतिकारी विचारांनी त्यांना नवी दिशा दिली. गदर मुखपत्राच्या मराठी आवृत्तीची जबाबदारी तसेच संघटनेच्या सैन्य भरतीचे नेतृत्व त्यांनी सांभाळले.
पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात सशस्त्र उठाव घडवून आणण्याचे जे महत्त्वाकांक्षी धोरण आखण्यात आले, त्यामध्ये रासबिहारी बोस यांच्यासह पिंगळे हे प्रमुख सूत्रधार होते. मात्र फितुरीमुळे हा उठाव निष्फळ ठरला आणि १६ नोव्हेंबर १९१५ रोजी पिंगळे यांना लाहोर येथे फाशी देण्यात आली.
“देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी प्राणार्पण करणारे पिंगळे हे देशप्रेम, त्याग, संघटनकौशल्य आणि ध्येयनिष्ठेचे प्रेरणादायी प्रतीक आहेत,भारतीय स्वातंत्र्य लढा हा मानवमुक्तीचा अद्वितीय इतिहास असल्याचे ही केत म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात मोहम्मद हुसेन पटेल म्हणाले की , “स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान अमूल्य असून देश त्यांचा सदैव ऋणी राहील,”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र धनक यांनी केले. व्याख्यात्यांचा परिचय विलास गोसावी यांनी करून दिला. कल्पना काकडे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. सतीश धुमाळ यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी डॉ.प्रा. दीपक गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रदीप बारवकर,ॲड वसंत उबाळे, आदित्य मैड, प्राचार्य समीर ओंकार, ओमप्रकाश सतीजा, खुशाल गाडे, गायक गणेश मराठे, डॉ. वैशाली साखरे, माजी नगरसेवक मंगेश खांडरे आदी उपस्थित होते.