Uncategorizedविशेषशैक्षणिक

शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्याधाम प्रशाला (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने आयोजित नाट्यवाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद .

स्पर्धेत १२ संघाचा सहभाग

शिरूर {डेली न्यूज पोस्ट टीम 24}शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्याधाम प्रशाला (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने आयोजित नाट्यवाचन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत तब्बल १२ संघांनी सहभाग घेत समाजाभिमुख आणि कालसुसंगत विषयांवर प्रभावी नाट्यवाचन सादर केले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पर्यावरणातील बदल, वाचनाचे महत्त्व, मानवी वस्तीत वाढलेला बिबट्याचा वावर, रक्तदान, मोबाईलचा अति वापर, प्रौढ साक्षरता तसेच भविष्यातील ‘एआय’ आधारित शाळा अशा विविध विषयांची मांडणी विद्यार्थ्यांनी नाट्यवाचनातून केली.

(संग्रहीत छायाचित्र )

स्पर्धेचे उद्घाटन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती मुळे यांच्या हस्ते झाले.

संस्कृती गटाने ‘सावट बिबट्याचे’ या नाट्यवाचनातून निसर्गसाखळीत बिबट्याचे महत्त्व आणि मानवी वस्तीत वाढलेल्या वावरामुळे निर्माण झालेले भयग्रस्त जनजीवन प्रभावीपणे मांडले. वरादा गटाने ‘माझे माहेर’ या नाट्यवाचनातून हुंड्यासारख्या सामाजिक कुप्रथेवर प्रहार केला. विद्या गटाच्या ‘ज्ञानांचा खजिना’ या सादरीकरणातून वाचनसंस्काराचे महत्त्व अधोरेखित झाले.

सरस्वती गटाने ‘कहाणी आटपाट नगराची’ यातून पर्यावरण विषयांची मांडणी केली, तर ज्ञानदा गटाच्या ‘अरे अरे पाऊसा’ या नाट्यवाचनातून लहरी हवामान, दुष्काळ, पूर आणि त्याचा शेतकऱ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम उलगडण्यात आला. शारदा गटाने रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले, तर श्रावण गटाने ‘आपण सारे शिकू या’ या नाट्यवाचनातून प्रौढ साक्षरतेचा संदेश दिला.

आश्लेषा गटाने कर्जग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडली, चित्रा गटाने ‘भविष्यातील शाळा’ या विषयातून शिक्षणात एआय व रोबोटचा वापर वाढला तरी शिक्षकांचे महत्त्व अबाधित राहील, हे स्पष्ट केले. शततारका गटाने अंधश्रद्धेविरोधातील संदेश दिला, तर ग्रीष्म गटाने मोबाईलच्या अति वापरामुळे हरवणाऱ्या बालपणावर भाष्य केले. पूर्वा गटाने ‘अति तिथे माती’ या नाट्यवाचनातून अतिरेकाचे दुष्परिणाम प्रभावीपणे सादर केले.

कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापिका ज्योती मुळे म्हणाल्या की, “विद्याधाम प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. अशा स्पर्धांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते.”

नाट्यवाचन स्पर्धेचे परीक्षण प्रा. अलका बेलोटे आणि प्रा. सतीश धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन अर्चना मारणे यांनी केले, तर आभार रोहिणी मापारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button