शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: मोटारसायकलवरून येऊन शेळी-बोकडे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक करत एकूण पाच गुन्ह्यांची उकल केली आहे. चोरीस गेलेली जनावरे शेतकऱ्यांना परत देण्यात पोलिसांना यश आले आहे.
बाभुळसर खुर्द, करंजावणे, गणेगाव खालसा व वाघाळे परिसरात शेळी-बोकड चोरीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी बाभुळसर खुर्द येथील शेतकरी माणिक रामभाऊ काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच पद्धतीने इतर शेतकऱ्यांकडूनही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर एकूण पाच गुन्हे नोंदविण्यात आले.
पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. शिरूर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. याचदरम्यान पोलिस अंमलदार योगेश गुंड यांना बातमीदारामार्फत गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) परिसरात दोन संशयित शेळी-बोकडे चोरत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गव्हाणवाडी परिसरात सापळा रचून गणेश कैलास ब्राम्हणे (वय २१) व सुनील अण्णाभाऊ माळी (वय २४, दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी बाभुळसर खुर्द, कर्डिलवाडी, वाघाळे, गणेगाव खालसा आदी ठिकाणांहून शेळी-बोकडे चोरल्याची कबुली दिली.
आरोपींकडून पाच बोकडे, एक शेळी तसेच गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल असा सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेली जनावरे शेतकऱ्यांना परत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, अंमलदार उमेश कुतवळ, योगेश गुंड, किशोर शिवणकर, नितीन भोरा, संदीप जगदाळे व रामेश्वर वाहेकर यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार नितीन भोस, संदीप जगदाळे व नितेश हुडे करीत आहेत.
उदय हिंदुराव शिंदे यांना डेली न्यूज पोस्ट टीम 24 च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा