क्राईम

बंधबिगारीचा धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील धुमाळ वस्तीवर दोन मजुरांकडून इच्छेविरुद्ध काम करून घेत, त्यांना मजुरी न देता मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी बंधबिगार पद्धती उच्चाटन अधिनियमांतर्गत शेतमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी गोरख दिलीप धात्रक (वय 27, सामाजिक कार्यकर्ते, श्री अमृत वाहिनी ग्रामविकास मंडळ, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रमोद हनुमंत येळे (रा. शिरसगाव काटा, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 648/2026 दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच ते सहा महिन्यांपासून ते 14 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शिरसगाव काटा येथील धुमाळ वस्तीमध्ये आरोपीने राकेश सरोज (रा. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) आणि परेश शंकर हाटकर (रा. मलठण, ता. शिरूर) या दोघांकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध शेतातील काम करून घेतल्याचा आरोप आहे. तसेच या कामाचा कोणताही मोबदला न देता, काम करण्यास नकार दिल्यास त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 146, 115(2) तसेच बंधबिगार पद्धती उच्चाटन अधिनियम, 1976 मधील कलम 16 व 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खबाले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button