Uncategorizedधार्मिंकराष्ट्रीयविशेष

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम, 24{हर हर महादेव, प्रभू श्री.रामलिंग महाराज की जयचा गजर करीत हजारो भाविकांनी जुने शिरूर येथील रामलिंग मंदिरातील शिवलिंगाचे महाशिवरात्री निमित्त दर्शन घेतले. महाशिवरात्रीला रामलिंग येथे यात्रेचे आयोजन केले जाते. व महाशिवरात्रचा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. शिरूर पंचक्रोशी व शहर यांचे प्रभू रामलिंग महाराज हे आराध्य दैवत असून महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते.
रामलिंग मंदिर हे शिरूर पासून ४ कि .मी. च्या अंतरावर असून या रामलिंग मंदिरा संदर्भात आख्यायिका सांगितली जाते की शिरूरचा हा भाग हा पूर्वी दंडकारण्यचा परिसर म्हणून ओळखला जात. प्रभू रामचंद्र वनवासात असताना या परिसरात आले होते. वनवासात असताना दिवसभर पायी चालल्यावर रात्री मुक्कामासाठी ते थांबत.
जेथे मुक्काम करीत तेथेच एखाद्या नदी अथवा ओढ्याच्या ठिकाणी आंघोळी नंतर तेथील वाळू घेवून पिंड तयार करून त्याची पूजा करत . रात्रभर विश्रांती करून सूर्योदयापूर्वी उठून मग पिंडीचे विसर्जन करून ते पुढील प्रवासासाठी जात. शिरुर येथे मुक्कामास असताना ते सूर ऋषीचा आश्रमात ते विश्रांती साठी थांबले.
नेहमी प्रमाणे त्यांनी वाळूची पिंड तयार केली. पूजाही केली. रात्री सूर ऋषीशी चर्चा करताना त्यांना झोपण्यास उशीर झाला . सकाळी जाग आली त्यावेळी सुर्योदय झाला होता. त्यामुळे नियमाप्रमाणे पिंड विसर्जन करण्याची वेळ होवून गेल्याने त्यांना पिंडीचे विसर्जन करता आले नाही.त्यांनी सूर ऋषीना या पिंडीची व्यवस्था पाहण्यास सांगितले व प्रभू रामचंद्र पुढील प्रवासास गेले. सूर ऋषींनी ही या पिंडीचे विसर्जन न करता ती तशीच ठेवली. व पुढे याला रामलिंग असे नाव पडले अशी आख्यायिका सांगितली जाते. काल शनिवार दिनांक १४ फेब्रुवारीला रामलिंग महाराज यांच्या पालखी सोहळा शिरूर मध्ये झाला.
आज ( १५ फेब्रुवारी)पहाटे २ च्या सुमारास शिरूर शहरातील बसस्थानका समोरून पालखी सोहळा रामलिंग मंदिराकडे मार्गस्थ झाला. यावेळी पालखी सोहळ्या सोबत नगरपालिकेचे माजी सभागृह नेते व उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या सह अनेक मान्यवर होते .पालखी सोहळा रामलिंग मंदिरा कडे जात असताना पाबळ फाटा, पेट्रोल पंप, आनंद सोसायटी, ओम रुदा वसाहत ,सह रामलिंग रोड वर ठिकठीकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. पहाटे पाचच्या दरम्यान ग्राम प्रदिक्षणा करून पालखी रामलिंग मंदिरात पहाटे पाचच्या सुमारास पोहचली
भाविकांसाठी महाप्रसादाचे ही वाटप करण्यात आले. त्याच बरोबर हरीनाम सप्ताहाचे ही आयोजन करण्यात आले होते. हजारोच्या संख्येने भाविकांनी यावेळी रामलिंग मंदिरातील पिंडीचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात विविध खेळणी, खाद्य पदार्थ यांची दुकाने लावण्यात आली होती.

