Uncategorizedराष्ट्रीयविशेषशैक्षणिक

कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर प्राची ललित नहार यांचे सनदी लेखापाल (सी.ए.) बनण्याचे स्वप्न साकार

शिरूर{ डेली न्यूज पोस्ट टीम 24}: कष्ट, जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर शिरूर शहरातील आनंद सोसायटी येथील प्राची ललित नहार यांनी सनदी लेखापाल (सी.ए.) बनण्याचे स्वप्न साकार करत शहराचा मान उंचावला आहे.
शालेय जीवनापासूनच अभ्यासात प्राविण्य मिळवणाऱ्या प्राची यांनी शिरूर येथील विद्याधाम प्रशाला, शिरूर येथे माध्यमिक शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेत त्यांनी ९७ टक्के गुण मिळवत गणित विषयात पैकीच्या पैकी गुण तर विज्ञान विषयात १०० पैकी ९८ गुण प्राप्त केले होते. बारावीचे विज्ञान शाखेचे शिक्षण त्यांनी राजस्थानातील कोटा येथे पूर्ण केले.
यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथून वाणिज्य शाखेची पदवी प्राविण्यासह विशेष श्रेणीत संपादन केली आणि पुण्यात सी.ए. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.
सनदी लेखापाल ही परीक्षा देशातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जाते. प्रचंड परिश्रम, मानसिक ताकद, सातत्यपूर्ण अभ्यास आणि अपार संयम यांची कसोटी पाहणाऱ्या या परीक्षेत यश मिळवणे हे मोठे स्वप्न असते. या सर्व आव्हानांवर मात करत प्राची यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
प्राची यांचे वडील ललित नहार हे भारतीय जनता पक्षचे माजी शहराध्यक्ष असून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची मोठी कन्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. नहार कुटुंब सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या कुटुंबातील या यशामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे.
प्राची यांच्या या यशाबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक पलांडे, पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, संघपती भरत चोरडिया, शिरूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मुथा तसेच सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पोटे यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्राची नहार यांचे यश हे केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून शिरूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. “स्वप्न मोठे असले तरी सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ते नक्की साकार होते,” हेच त्यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button