नमामि चंद्रभागा”तून घोडनदीकाठाला नवे हरित रूप पर्यावरणीय पुनर्स्थापना व उद्यान विकास कामांचे भूमिपूजन
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या “नमामि चंद्रभागा” अभियानांतर्गत नदीकाठ पुनरुज्जीवन व उद्यान विकास कामांचा शुभारंभ घोडनदी किनारी, एसटीपी प्लांट शेजारी उत्साहात पार पडला. शिरूर नगरपरिषद हद्दीतील स. नं. २६९ पै. व २७० या ठिकाणी भूमिपूजन समारंभ झाला.
या कार्यक्रमाचे भूमिपूजन आमदार ज्ञानेश्वर माऊली (आबा) कटके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे होत्या.
कार्यक्रमास मुख्याधिकारी प्रितम पाटील, उपनगराध्यक्ष श्री. मितेश प्रदीप गादिया, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती श्री. सुनिल शंकर जाधव, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती श्री. एजाज अन्सार बागवान, पाणीपुरवठा समितीच्या सभापती सौ. सुनिता संतोष पोटे, नियोजन व विकास समितीच्या सभापती सौ. स्वाती चेतन साठे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. आयेशा कलिम सय्यद यांच्यासह नगरसेवक नगरसेविका
तसेच प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगरचना सहायक पंकज काकड, सहाय्यक करनिरीक्षक दीपक कोल्हे, अग्निशमन अधिकारी सचिन वाळूंज, महेश कदम यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. शहरातील नागरिक व पर्यावरणप्रेमींनीही कार्यक्रमास हजेरी लावली.
आमदार कटके यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, “नदी संवर्धन व हरित क्षेत्रवाढ ही केवळ विकासाची बाब नसून पुढील पिढ्यांसाठीची पर्यावरणीय जबाबदारी आहे.”
नगराध्यक्षा पाचर्णे यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे शिरूर शहरात पर्यावरणपूरक सार्वजनिक जागा निर्माण होईल. नागरिकांना सकस, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
“नमामि चंद्रभागा” अभियानांतर्गत नदीकाठ स्वच्छता मोहीम, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, चालण्याचे मार्ग (Walking Track), विश्रांती क्षेत्र (Sitting Area), हरित पट्टा विकास आणि सौंदर्यीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. नदीकाठचे जैववैविध्य जपत पर्यावरणीय पुनर्स्थापना केली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे शहराच्या पर्यावरणीय संतुलनास चालना मिळेल, भूजल पातळी सुधारण्यास मदत होईल तसेच नागरिकांसाठी विरंगुळ्याची आणि व्यायामाची सुयोग्य जागा उपलब्ध होईल. शाश्वत शहरी विकास (Sustainable Urban Development) साध्य करण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले. “नमामि चंद्रभागा”च्या माध्यमातून शिरूर शहर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहे.