राष्ट्रीय
सकल हिंदू समाजाचे संमेलन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हिंदू संमेलन ज्ञानगंगा विद्यालयाच्या मैदानावर उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संमेलनाची सुरुवात भव्य शोभायात्रेने झाली. टाळकरी मुलांच्या टाळांच्या निनादाने आणि विविध पारंपरिक कलांच्या सादरीकरणाने परिसर दुमदुमून गेला. महिला व पुरुषांनी फुगडी तसेच वारकरी नृत्य सादर करत कार्यक्रमात भक्तिमय आणि आनंददायी वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमस्थळी करण्यात आलेली आकर्षक भगवी सजावट, सुंदर रांगोळी आणि भव्य स्वरूपात सजवलेले मैदान पाहून उपस्थित नागरिक मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे संयोजक सुनील भालेकर तर सहसंयोजक कल्याण आमटे होते.
बलिदान मासाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ ही लघुनाटिका गंगा विहार सोसायटीतील बालकांनी सादर केली. या नाटिकेचे नियोजन अरुण काकड यांनी केले होते. नाटिकेतील भावपूर्ण प्रसंगांमुळे उपस्थित नागरिक भावुक झाले.
यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. दादामहाराज सोनवणे यांनी सनातन धर्मपरंपरेचे महत्त्व आणि हिंदू संस्कृतीची परंपरा याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले. अॅड. कोमल बोरा यांनी समाजपरिवर्तनात स्त्रीशक्तीची भूमिका प्रभावीपणे मांडली
. तसेच वक्ते अभिजित शिंदे यांनी सामाजिक बंधुता दृढ करण्याची गरज, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भागवत यांनी केले, तर आभार प्रदर्शन गणेश देशमुख यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता नीलम मंगेश भालेराव यांनी पसायदान सादर करून केली.
या संमेलनात श्री स्वामी समर्थ केंद्र, इस्कॉन केंद्र, शिवशंभू मित्रमंडळ तसेच विविध सामाजिक व धार्मिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग होता.



