Uncategorizedअपघात
शिरूर शहरातील जुन्या पुणे नगर रस्त्यावर एस टी बस च्या धडकेत युवकाचा मृत्यू
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम, 24}: भरधाव एस.टी. बसने दुचाकीला धडक दिल्याने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १३) सायंकाळी शिरूर शहरात घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एस.टी. बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत जयसिंग भोसले (वय २६, रा. न्हावरे ता. शिरूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर खंडु माणीक सोनवणे (रा. निंभोरा ता. कन्नड जि. संभाजीनगर) असे एस.टी. बस चालकाचे नाव आहे.
शुक्रवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास शिरूर शहरातील नवीन नगरपरिषदेच्या समोरील रस्त्यावर पाँकेट कॅफेसमोर चंद्रकांत भोसले हे त्यांच्या ट्रायम्फ कंपनीच्या दुचाकीवर (एमएच १२ एक्सजे १५५५) बसून रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यावेळी पुणे बाजूकडून येणाऱ्या एमएच १४ एमएच ८९३५ क्रमांकाच्या एस.टी. बसने भरधाव वेगात येत त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात भोसले गंभीर जखमी झाले. उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मृताचे वडील जयसिंग नरसिंग भोसले (वय ६६, रा. न्हावरे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एस.टी. बस चालक खंडु सोनवणे याच्याविरुद्ध
भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), २८१, १२५ (अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा शुक्रवारी रात्री ९.२२ वाजता नोंदविण्यात आला. पोलीस हवालदार पवार यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार बनकर करीत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.








