राष्ट्रीय
चव्हाणवाडीत वेदांश इंडस्ट्रीजला भीषण आग; सुमारे १.०५ कोटींचे नुकसान
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}तालुक्यातील चव्हाणवाडी येथील वेदांश इंडस्ट्रीज या औद्योगिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीत सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास कंपनीचे प्रतिनिधी सुरज हनुमंत जासुद हे शिरूर येथे असताना कंपनीतील कामगार जय करण याने फोन करून कंपनीला आग लागल्याची माहिती दिली.
त्यानंतर जासुद तातडीने चव्हाणवाडी येथील कंपनीत पोहोचले असता कंपनीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागलेली दिसून आली.
घटनेची माहिती तत्काळ शिरूर येथील अग्निशमन दल तसेच आयएफबी कंपनीच्या अग्निशमन गाडीला देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मात्र तोपर्यंत आगीने मोठा भडका घेतला होता. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
-
या आगीत कंपनीत साठवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक स्क्रॅप जळून खाक झाले. तसेच कंपनीभोवती उभारलेले पत्र्याचे कंपाउंड, कार्यालयातील टेबल व त्यातील कागदपत्रे, पीयूएफ
दरवाजा व चौकट, तसेच ग्राइंडर मशीन, कन्व्हेयर, केबल धार मशीन, गड्डा मशीन, पत्र्याचे शेड, लाईटची डीपी, वीजतारा, मीटर आदी साहित्य जळून नुकसान झाले.
या आगीत अंदाजे १ कोटी ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच न्हावरे पोलीस चौकीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात जळीत नोंद (रजिस्टर क्र. ०२/२०२६) करण्यात आली असून पोलीस हवालदार पवार यांनी नोंद केली आहे. सहायक फौजदार भोते पुढील तपास करत असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.



