शिरूरकरांकडून आशा भोसले यांना आदरांजली; ‘तू जो मेरे सूर में’ कार्यक्रमात अजरामर गीतांची मैफल
शिरूर { डेली न्यूज पोस्ट 24)हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या स्मरणार्थ शिरूरमध्ये आयोजित ‘तू जो मेरे सूर में’ या संगीतमय कार्यक्रमातून रसिकांना सुरेल मेजवानी लाभली. ओंकार संगीत विद्यालय आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कलाकारांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात सदाबहार गीतांनी वातावरण भारून गेले.
बाबुराव नगर येथील डेक्कन स्कूलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार महेश कुलकर्णी, प्राचार्य विनायक म्हसवडे, डॉ. समीर ओंकार आणि पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष महादेव भाटकर यांच्या हस्ते सरस्वती व गणेश पूजनाने झाली. यावेळी पत्रकारितेतील योगदानाबद्दल महेश कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश मराठे यांनी सादर केलेल्या गणेशस्तुतीने भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यानंतर लता मंगेशकर , किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या अजरामर गीतांची मालिकाच रंगली. ‘एक दिन बिक जाएगा’, ‘बाहों में चले आओ’,
‘रिमझिम गिरे सावन’, ‘दर्द-ए-दिल’, ‘मैं हूं डॉन’, ‘वादा कर ले साजना’ यांसारख्या गाण्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आशा भोसले यांच्या ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ या गाण्यांची जुगलबंदी विशेष ठरली. ‘अभी ना जाओ छोड़कर’ या भावपूर्ण गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक गणेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली केतन गोसावी, गोपाल भावसार, नितीन मामीडवार, डॉ. समीर ओंकार, डॉ. नूतन क्षीरसागर, मोनाली जाधव, सुषमा झावरे आदी कलाकारांनी सुरेल सादरीकरण केले. अहिल्यानगरहून आलेल्या वाद्यवृंद व ध्वनिवर्धक व्यवस्थेमुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली. पोदार इंटरनॅशनल स्कूलचे उपप्राचार्य गिरीश हाडके यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली.
या वेळी डॉ. सदानंद गायकवाड, डॉ. सुजाता कोकरे, डॉ. अनिल साळुंखे, डॉ. अनिता सोळुंखे, डॉ. आनंद क्षीरसागर, डॉ. भारती शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.