मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्यासह महिला व पुरुष पोलिसांचे पथक कारवाईदरम्यान तैनात होते.
नगरपालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.
शहरातील विविध भागांत स्वतंत्र पथके तयार करून एकाच वेळी कारवाई करण्यात आली. पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर तसेच बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्गावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. याशिवाय सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर आणि सेंटर दवाखाना रोड येथेही अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्यात आली.
कारवाईदरम्यान रस्त्यावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, वाहतुकीस अडथळा ठरणारे अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने ही मोहीम प्रभावीपणे पार पडली.
शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असून अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये आणि शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे