पुणे-नगर रोडवरील जोशीवाडी परिसरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}: येथील जोशीवाडी परिसरातील पुणे-नगर रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर व त्रास सहन करावा लागत होता. वाहनचालकांसह पादचारी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने परिसरात अपघातांची भीतीही निर्माण झाली होती.
अखेर या समस्येची दखल घेत संबंधित विभागाकडून खड्डे बुजविणे तसेच स्पीड ब्रेकर उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
यासंदर्भात नगरसेवक संतोष थेऊरकर म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत प्रवास करावा लागत होता. विशेषतः रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती..दरम्यान, नगरसेवक संतोष थेऊरकर व नगरसेविका सुनीता भुजबळ यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजित पाचर्णे, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती सुनील जाधव तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रलंबित असलेले रस्त्याचे काम मार्गी लागले आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासोबतच आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारण्यात येत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. स्थानिकांनी संबंधित प्रशासनाचे आभार मानत उर्वरित रस्त्यांचीही तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.








