Uncategorizedमहाराष्ट्रस्थानिक

शिरूर नगरपरिषदेची अतिक्रमणविरोधी मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू दोन्ही दिवस मिळून १७७ हून अधिक अतिक्रमणे काढली.

शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने सुरू केलेली अतिक्रमण निर्मूलन मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवली. सोमवारी विविध भागांत कारवाई करण्यात आली असून हलवाई चौक परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

नगरपरिषदेच्या पथकाने हलवाई चौक, सरदार पेठ, कापड बाजार, राम आळी, मारुती आळी परिसरात कारवाई केली.जैन मंदिराच्या मागील उर्दू शाळेकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील टपरी हटविली.

शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये असलेल्या कापड बाजार, आडत बाजार, सुभाष चौक परिसरातील दुकानांसमोरील शेड, पाट्या, ओटे व पायऱ्या हटविण्यात आल्या. तसेच रस्त्यावरील  वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.

मुख्याधिकारी प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नियंत्रणाखाली महिला व पुरुष पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, रचना सहाय्यक पंकज काकड, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे, कर निरीक्षक माधव गाजरे यांच्यासह शंभरहून अधिक कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते.

पाबळ फाटा ते बी. जे. कॉर्नर, बी. जे. कॉर्नर ते तहसील कार्यालय मार्ग, सी. टी. बोरा कॉलेज रोड, रेव्हेन्यू कॉलनी परिसर तसेच सेंटर दवाखाना रोड येथे स्वतंत्र पथकांमार्फत एकाच वेळी कारवाई करण्यात आली. जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशमन वाहन आणि आवश्यक मनुष्यबळाच्या सहाय्याने मोहीम राबविण्यात आली.

शहराचे सुशोभीकरण, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त राखणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी असून अशा मोहिमा पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण करू नये व शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button