गावाकडच्या पोरी लईच भारी’चा तिसरा भाग ५ जुलैला; नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी
शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम 24}ग्रामीण जीवन, सामाजिक प्रबोधन आणि हास्यविनोदाचा संगम असलेल्या ‘गावाकडच्या पोरी लईच भारी’ या वेबमालिकेचा तिसरा भाग ५ जुलै रोजी प्रदर्शित होणार असून, यापुढे दर रविवारी तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनेलवर मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती निर्माता-दिग्दर्शक व लेखक रामदास राऊत यांनी दिली.
तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक प्रबोधन, हास्यविनोद आणि हृदयस्पर्शी कथानकांवर आधारित निर्मिती सातत्याने केली जात आहे. ग्रामीण संस्कृती, सामाजिक प्रश्न आणि मनोरंजनाचा समतोल साधणाऱ्या या निर्मितींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘गावाकडच्या पोरी लईच भारी’ या मालिकेचे आतापर्यंत दोन भाग प्रदर्शित झाले असून, तिसरा भाग ५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
या मालिकेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे रामदास राऊत यांनी सांगितले. प्रत्येक भागात नवीन कथानक आणि नव्या कलाकारांचा सहभाग असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मालिकेत पुण्यातील अभिनेते सुनील गोडबोले, राजेंद्र ताम्हाणे, अलका जोगदंड, कवी तथा अभिनेते नरके सर, नंदकुमार पाटील, प्रा. विजय जोरी, पापाभाई बोरगावकर यांच्यासह सुभाष खोसे, सचिन कवठेकर, बाबा पारखे, निळकंठ चोरे, रमेश खाडे, अमोल गायकवाड, सुवर्णा गोपळे, अंजना दोडके, विशाल ससाणे, माऊली कडूसकर, गणेश कडूसकर, अविनाश सोनार आणि भानुदास थोरात यांनी भूमिका साकारल्या आहेत. प्रमुख अभिनेत्री म्हणून भक्ती परदेशी, अनुष्का धुमाळ आणि रिया कानवडे झळकत असून रमजान सय्यद, समद पठाण, वजीर शेख (पाथर्डी) यांचाही सहभाग आहे.
वाद्यवृंद क्षेत्रातील ताशाकिंग सिराजभाई मनियार निर्वीकर, बापू शिंदे, ढवळगावकर आणि गायकवाड (गारखेडीकर) यांनीही आपल्या कलेचा आविष्कार या मालिकेत सादर केला आहे.
पुढील भागांचे चित्रीकरण गुणोरे येथील भैरवनाथ, हनुमान, खाशाबा, महादेव आणि मुक्ताई मंदिर परिसरात करण्यात येणार आहे. या निर्मितीसाठी विनोद गोपळे, राधू साळवे, अरुण बडे, बबन दादाभाऊ बडे पाटील तसेच गुणोरे ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल रामदास राऊत यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सामाजिक आशय, ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि मनोरंजनाचा मिलाफ असलेली ‘गावाकडच्या पोरी लईच भारी’ ही मालिका दर रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, रसिकांनी तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनेलला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही राऊत यांनी केले.